मैदानात अवतरले राजा, राणी आणि नजाफगडचा नवाब…

यावेळी मैदानात क्रिकेट खेळत लहानग्यांसोबत बेल्जियमच्या राणीनेही धमाल केली.

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थान दौऱ्यावर आलेल्या बेल्जियमचे प्रिन्स फिलीप व क्वीन मथाईल्ड यांनी शुक्रवारी हिंदुस्थानातील लहान मुले व मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी ‘युनिसेफ’ या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यात ‘दे दणादण’ फटकेबाजी केली. ओव्हल मैदानात पार पडलेल्या या सामन्यात गोलंदाजांच्या चिंधडय़ा उडवणारा हिंदुस्थानचा माजी फलंदाज, नजाफगडचा नवाब वीरेंद्र सेहवागसह मुंबईतल्या दोन शाळांतील मुलांनीही क्रिकेटचा आनंद घेतला.

हिंदुस्थानात लहान मुलांवर होणारे अत्याचार, बालविवाह, शिक्षणाचा अभाव, आरोग्याची दैना याचे प्रमाण अधिक आहे. या सर्व बाबींना मुळासकट नष्ट करून लहान मुला-मुलींना उत्तम आहार, निरोगी आरोग्य, अव्वल दर्जाचे शिक्षण, मैदानातील खेळ, उत्तम व सुरक्षित वातावरणात त्यांची होणारी वाढ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मथाईल्ड यांनी यावेळी आवर्जून सांगितले.