येरोळ, धामणगाव, कारेवाडी येथील घरकुलाचे लाभार्थी अनुदानापासून वंचित

2

सामना प्रतिनिधी । शिरुर अनंतपाळ

शिरुर अनंतपाळ तालूक्यातील मौजे येरोळ, धामणगाव, कारेवाडी, येथील रमाई आवास योजना शबरी योजना तसेच रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान अद्यापपर्यंत मिळालेले नाही. सदरील अनुदानाची रक्कम त्वरीत देण्यात आली नाही तर प्रजासत्ताक दिनी शिरुर अनंतपाळ पंचायत समितीसमोर सर्व लाभार्थी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मौजे येरोळ, धामणगाव, कारेवाडी या गावातील लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत. येरोळ येथे रमाई आवास योजनेअंतर्गत सन २०१४ – १५ मधील तीन लाभार्थ्यांना अंतिम बिल मिळालेले नाही. सन २०१६ – १७ मधील ७७ लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेतील रोजगार हमी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाचा एकही पैसा मिळाला नाही. २०१६ – १७ मधील काही लाभार्थ्यांना दुसरा, तिसरा हप्ता मिळालेला नाही. २०१६ – १७ मधील पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाचा एकही पैसा मिळालेला नाही.

धामणगाव येथील रमाई आवास योजनेअंतर्गत २०१६ – १७ मधील ५० लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम पूर्ण केले. त्यांनाही रोजगार हमी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाचा पैसा मिळाला नाही. २०१६ – १७ मधील लाभार्थ्यांना दुसरा, तिसरा हप्ता मिळालेला नाही. २०१६ – १७ मधील शबरी योजनेतील दोन लाभार्थ्यांना अंतिम बिल मिळाले नाही. २०१६ – १७ च्या पंतप्रधान आवास योजनेतील दोन लाभार्थ्यांना अंतिम बिल मिळाले नाही. कारेवाडी येथील लाभार्थ्यांनाही रक्कम मिळालेली नाही. सर्व लाभार्थ्यांची राहिलेली रक्कम व रोजगार हमी योजनेची रक्कम अदा करण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यावर कारवाई करावी व त्वरीत रक्कम अदा करावी अन्यथा प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर ज्ञानेश्वर बनसोडे, भिमराव बनसोडे, गजानन बनसोडे, नागनाथ बनसोडे, वसंत वाधमारे, तिरुपती लोंढे, पांडुरंग बनसोडे, प्रल्हाद बनसोडे, दगडू बनसोडे यांच्यासह सुमारे ५१ लाभार्थ्यांची नावे व स्वाक्षऱ्या आहेत.