आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या, बेस्टचा गाडा हाकणार कसा?

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या’ ही हिंदी भाषेतली म्हण बेस्ट बसच्या बाबत अगदी तंतोतंत खरी आहे. बेस्टच्या कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या चार दिवसांपासून मुंबईकरांचे हाल होतायत. पण हीच बेस्ट रोज कोट्यवधींचा तोटा सोसून मुंबईकरांना सेवा देत असते. रोज तीन कोटींचे उत्पन्न असलेल्या बेस्टला दर दिवशी या उत्पन्नाच्या दुप्पट म्हणजेच तब्बल सहा कोटींचा तोटा सोसावा लागतो. वार्षिक 900 कोटींचा तोटा सोसणाऱ्या बेस्टचा गाडा हाकायचा तरी कसा?

वरून धावणारी लाल रंगाची बेस्ट बस आजही अनेक सर्वसामान्यांसाठी पैसे बचतीचा मार्ग असतो. वेळेत बस आली नाही की बसला शिव्या घालायच्या हे मुंबईकरांना माहीत असते. पण या बसचा हा तोटा का वाढत चालला आहे हेसुद्धा मुंबईकरांनी जाणून घेतले पाहिजे. शेअर टॅक्सी किंवा रिक्षापेक्षा कमी पैशात प्रवाशांना आपल्या मुक्कामी नेणाऱया बेस्टला तिकिटातून फारसे उत्पन्न मिळत नाही.

ट्रफिकमुळे गणित बिघडले
एक लिटर पेट्रोलमध्ये प्रत्येक बसने 3 कि.मी.चे अंतर पार करणे गृहीत धरलेले आहे. त्यानुसार संपूर्ण विभागाचे कामाचे नियोजन होत असते. पण गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढलेली गाडय़ांची संख्या, मेट्रोने खोदून ठेवलेले रस्ते यामुळे गाडय़ा आपले कि.मी.चे लक्ष्य कधीच पूर्ण करू शकत नाही. गेलेली बस वेळेत परत न आल्यामुळे पुढचे सगळेच गणित बिघडते. एखादा सण असला आणि मिरवणूक जात असली की जागेवरच खिळून राहिलेल्या बसचा तोटा विचारात कोण घेतो? पावसात, अतिवृष्टीत, दंगलीत हा तोटा वाढला तरी बस मात्र रस्त्यावरून धावत असते.

एका बसमागे 10 हजारांचा तोटा
एका बसचे दिवसाचे उत्पन्न 9000 रुपये आहे. तर तोटा 19 हजार रुपये आहे. त्यामुळे एका बसमागे तब्बल 10 हजार रुपयांचा तोटा रोज बेस्टला सोसावा लागतो.

हे आहेत उत्पन्नाचे स्रोत
तिकिटातून मिळणाऱया तुटपुंज्या उत्पन्नाबरोबर बेस्टचे बसस्टॉप, बसगाडय़ा आणि विजेचे पोल यावर केल्या जाणाऱया जाहिरातीतून बेस्टला सुमारे 100 ते 125 कोटींचे वार्षिक उत्पन्न मिळते.

असे आहे गणित

 • परिवहन विभागाचे एका दिवसाचे उत्पन्न : 3 कोटी
 • एका दिवसाचा खर्च : 6 कोटी
 • रोजचा तोटा : 3 कोटींचा
 • वार्षिक तोटा : 1080 कोटी
 • जाहिरातीतून उत्पन्न : 100 ते 125 कोटी
 • विद्युत विभागातून मिळणारे उत्पन्न : 160 कोटी
 • निव्वळ वार्षिक तोटा : 750 कोटी
 • एकूण बसगाडय़ा : 3300
 • दररोज पार केले जाणारे एकूण अंतर : 7 लाख कि. मी.
 • एका बसमागे आवश्यक प्रत्यक्षात
 • 10 कामगार 7 कामगार (3 ड्रायव्हर, 3 कंडक्टर, 1 इंजिनीयर)
 • कि.मी. लक्ष्य – 180 ते 200 कि.मी. प्रत्यक्षात- 160 कि.मी.
 • प्रति लिटर अंतर 3 कि.मी. प्रत्यक्षात- 2.70 कि.मी.
 • दोन बसमधील फ्रीक्वेन्सी 15 मिनिटे कमाल, प्रत्यक्षात – 40 मिनिटे

विद्युत विभागाचा आधारही गेला
बेस्टचा विद्युत विभाग हा नफ्यात असून त्याचा नफा पूर्वी परिवहन विभागाकडे वळता करता येत होता. मात्र केंद्र सरकारच्या काही कायद्यामुळे हा नफा वळवण्याची मुभाही बंद झाली. मात्र बेस्ट उपक्रमाची 1000 कोटींची गुंतवणूक विद्युत विभागात आहे. त्यामुळे विद्युत विभागाच्या नफ्याच्या 16 टक्के म्हणजेच साधारणतः 160 कोटी परिवहन विभागाला मिळतात.