मित्र

 इशा केसकर

फ्रेंड… फिलॉसॉफर गाईड!!

तुझा मित्र…चैतन्य केसकर (माझे बाबा)

 त्यांच्यातली सकारात्मक गोष्ट…कधीच कुठल्याही विषयाबद्दल एकाच बाजूने सूचना देत नाही. त्यामुळे मला निर्णय घ्यायला मदत होते. सतत माझी बाजू घेतात. प्रीलियमच्या परीक्षेत एका विषयात मी नापास झाले होते. तेव्हा बाबांनी माझ्या रिपोर्ट कार्डवर सही केली, ताण घेऊ नकोस, आईलाही सांगणार नाही, असं सांगितलं. वडिलांपेक्षा तो माझा प्रत्यक्षात मित्रच आहे.

त्यांच्यातली खटकणारी गोष्ट…अजिबात ऐकत नाहीत.

त्यांच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट…माझ्या आईशी लग्न केलं. दोघेही मेड फॉर इच अदर आहेत. खूप अनपेक्षितपणे माझा जन्म झाला.

त्यांच्याकडून काय शिकलीस ?…संयम शिकले. आदर करायचा शिकले. त्यांना कशाचाही गर्व नाही. कुठल्याही गोष्टीबाबत पटकन निष्कर्ष लावत नाही. माणसं पारखायला चांगलं जमतं.

त्यांचा आवडता पदार्थ…भाकरी आणि मेथी-पालकाची डाळ घालून केलेली भाजी.

 ते निराश असतात तेव्हा…शक्यतो कधी निराश नसतात, पण लगेच काय आवडलं, नाही आवडलं ते सांगतात. ते स्पष्टवक्ते आहेत.

एकमेकांसाठी वेळ देता का ?…हो, जेव्हा माझी चिडचिड होते किंवा कुठल्याही प्रकारची अडचण आली तर कायमच कोणत्याही प्रकारच्या सल्ल्यासाठी मी त्यांना फोन करते. ज्याची माहिती नसेल तर माहिती करून घेऊन त्याबद्दल सल्ला देतो याचं मला खूप कौतुक आहे. कारण माझे वडील ४० वर्षांचे होते. तेव्हा मी त्यांना झाले. खूप जनरेशन गॅप आहे. ते स्वतःही आता इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर आलेत. फोटो लाईक करणं, कमेंट करणं मी त्यांना शिकवते. स्वतःला अपडेट ठेवण्याचा ते प्रयत्न करतात. पुस्तक वाचनाचं भयंकर वेड आहे. पेपर आणि कोडी सोडवणं हे त्यांचे छंद आहेत.

दोघांचे भेटण्याचे ठिकाण…बऱयाचदा गच्चीत भेटतो.

त्यांच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण…बाबांना एकदा रुग्णालयात दाखल केलं होतं. डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्य ते अजिबात ऐकत नव्हते. मला याचा खूपच ताण आला होता. त्यांना मी त्यांच्या पथ्याविषयी सांगितलं. ते त्यांनी ऐकलं तेव्हा मला वाटलं की, मी त्यांची मुलगी नाही तर मैत्रीण झाले. हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा अविस्मरणीय क्षण.

तू चुकतेस तेव्हा ते काय करतात…ते मला चुकू देतात आणि चुकांमधून शिक, असं सांगतात. कधीच ओरडत नाहीत.

भांडण झाल्यावर काय करता ?…माझं आणि त्यांचं भांडण कधी होत नाही आणि झालंच तर आम्ही दोघंही लगेच संपवतो. बाबा कायम माझीच बाजू घेतात.

दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो ?.. मला

 तुझी एखादी त्यांना आवडणारी सवय…वेळेवर न पोहोचणे.

 तुझ्या दृष्टीने मैत्रीची व्याख्या ..ज्याच्यात तुमचं नातं कोणतं आहे त्यापेक्षा ते नातं किती निखळ आहे हे महत्त्वाचं.

 तुम्हाला तो कसा हसवतो ?…ज्या दिवशी मी निराश असेन तेव्हा फक्त माझं त्यांच्याशी झालेलं संभाषण माझा ताण दूर करतं.

एकत्र पाहिलेला नाटक/ सिनेमा ?…फँड्री, दुर्गा झाली गौरी.