सखेसोबती


योगेश नगरदेवळेकर

पाण्यातील साप…सह्याद्रीच्या पश्चिम घाटात सापाची नवी प्रजाती सापडली आहे. पाहूया काय आहे ती…

सूर्यमालेतील एक तप्त गोळा हळूहळू थंड होत गेला. या गोळय़ावर समुद्र बनले, जमीन तयार झाली. नैसर्गिक घटकांनी पाण्यातल्या जीवनाला सुरुवात झाली. हळूहळू सजीवांनी पाणी, जमीन, आकाश व्यापले. नुसतेच प्राणी, पक्षी नव्हे तर अनेकविध वृक्षवेलींनी पृथ्वी सजली, नटली. या प्राण्यांतूनच एक शहाणा प्राणी पुढे आला आणि बुद्धीच्या जोरावर त्याने पृथ्वी पादाक्रांत केली. प्रत्येक गोष्टीचं त्याला औत्सुक्य हे काय? हे कसं काय?

प्रत्येक सजीवाचे त्याने गट तयार केले. त्यांचा अभ्यास करून त्यांची सुसंगत मांडणी केली आणि त्यांचे प्राणी, पक्षी, वनस्पती असे मोठे गट बनवून त्यात त्यांच्या वैशिष्टय़ानुसार विभागणी करत करत त्या-त्या सजीवाला एक वैशिष्टय़पूर्ण नाव बहाल केले. प्राणी विश्वातील होमोजीनसमधला सेपियन (शहाणा) म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द मानवाचे हे शास्त्रीय नाव आहे. अशा प्रकारे प्रत्येक सजीवाला नाव दिले गेले आहे.

पण आता या नामपुराणाचे कारण काय? कारण असं झालं की, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या खालच्या सहय़ाद्री पट्टय़ात सापाची नवीन प्रजाती सापडली आणि तिचं नाव ठेवलं ‘ऍक्वाटिक रॅब्डॉप्स’ रॅब्डॉप्स या प्रजातीमधील पाण्यात आढळणारा जलचर साप म्हणून ‘ऍक्वाटिक रेब्डॉप्स’. नवीन प्रजाती सापडली म्हणजे नक्की काय झालं? असा प्रश्न पडतो. म्हणजे या प्रकारचे साप आताच जन्माला आले का? परंतु तसं नसतं. नवीन प्रजाती सापडते म्हणजे चुकून दुसऱया गटात किंवा दुसऱया नावाने ओळखल्या जाणाऱया जीवाला योग्य नामकरण करणं. आता याच सापाचं बघा ना. १८६३ मध्ये केरळमधील वायनाड जिल्हय़ातून सापांचे काही नमुने गोळा केले गेले. त्यात या प्रकारच्या सापाला ऑलिव्ह फॉरेस्ट साप असं चुकीचे समजले जात होते. जसजसा या प्रजातींबद्दलचा अभ्यास केला गेला तेव्हा तो वेगळा आणि हा वेगळा लक्षात येत गेले.

अर्थातच हे वेगळेपण शोधणे इतके सोपे नसते. एनसीबीएसचे डॉ. वरद गिरी आणि त्यांच्या सहकारी चमूने जवळपास ८ वर्षे केलेल्या अभ्यासातून ही गोष्ट पुढे आली आहे. समान रंगाचे, समान गुण असणारे साप वेगळय़ा प्रजातीचे असू शकतात. हे नुसते पाहून ठरवता येत नाही. त्यासाठी वर्षाच्या वेगवेगळय़ा कालखंडात त्यांच्यात होणारे दृश्यबदल किंवा ते सामान्यपणे कुठे वसती करतात यांची निरीक्षणे बिनचूकपणे नोंदवावी लागतात. ‘ऑक्वाटिक रॅब्डॉप्स’ सापाचे अस्तित्व कोयना, सांगली, आंबोली, सिंधुदुर्ग ते उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या हद्दीतील सहय़ाद्री पट्टय़ात आहे. म्हणजे एवढय़ा मोठय़ा प्रभागातून त्यांच्या अधिवासाचा अभ्यास केला गेला.

पिलं आणि प्रौढ साप दिसायला वेगळे असतात. त्यामुळे त्यांच्यावर संशोधन करताना ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते. या प्रजातीतील सापांची जास्तीत लांबी सुमारे १ मीटर आढळली आहे. हा पूर्णपणे बिनविषारी आहे. अशा प्रकारे अनेक प्रजातींबाबत संशोधन सुरूच आहे. वेगवेगळय़ा प्रजातीसमोर येत आहेत. माणूस कितीही बुद्धिमान झाला तरी निसर्गापुढे तो लहानच आहे, अशी अनेक गुपिते अजून उलगडायची आहेत.