अभिनेत्री माधवी जुवेकरसह सात कर्मचारी बेस्टमधून बडतर्फ

सामना ऑनलाईन, मुंबई

मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री माधवी जुवेकर हिच्यावर बेस्ट प्रशासनाने बडतर्फीची कारवाई केली आहे. गेल्या वर्षी दसरा मेळाव्यात नोटा उधळून केलेल्या नृत्याबाबत प्रशासनाने विभागीय चौकशीअंती तिच्यावर ही कारवाई केली. तिच्यासह आणखी सहा कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने बडतर्फीची कारवाई केली. दरम्यान, ही शिक्षा खूप जास्त आणि जालीम असून ती कमी करण्याचे निर्देश बेस्ट समितीचे अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी प्रशासनाला ताबडतोब दिले आहेत.

अभिनेत्री माधवी जुवेकर ही बेस्टच्या विद्युत विभागात कर्मचारी आहे. गेल्या वर्षी दसरा मेळाव्यादरम्यान बेस्टच्या वडाळा आगारात आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या वेळी तिने व तिच्या काही सहकाऱ्यांनी नृत्य केले होते. यावेळी अंगावर नोटा उधळून केलेल्या नृत्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती. माधवीने केलेल्या नृत्यावर सर्व स्तरांतून टीका होऊ झाली होती. या टीकेनंतर बेस्ट समितीचे तत्कालीन अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी चौकशीचे आदेश दिले होते. गेले सात-आठ महिने तब्बल 14 कर्मचाऱ्यांची या प्रकरणी चौकशी सुरू होती. या प्रकरणी बेस्टची प्रतिमा मलिन केल्यामुळे माधवी जुवेकरसह सात जणांना बडतर्फ करण्याची शिक्षा बेस्ट प्रशासनाने दिली आहे. या नृत्याच्या वेळी वापरण्यात आलेल्या नोटा खोटय़ा होत्या, असेही जुवेकर यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, तत्कालीन अध्यक्ष अनिल कोकीळ यांनीही या शिक्षेला विरोध केला आहे. या कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या तुलनेत ही शिक्षा खूप मोठी असून शिक्षा कमी करण्यासाठी आपण विद्यमान अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांना तसेच महाव्यवस्थापकांना विनंती करणार असल्याची प्रतिक्रिया कोकीळ यांनी दिली.

चुकीचे समर्थन नाही पण शिक्षा कमी झालीच पाहिजे!

या चौकशीचा अहवाल गेल्या आठवडय़ात महाव्यवस्थापक
डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी माझ्याकडे सादर केला होता. या घटनेचे मी समर्थन करीत नाही, मात्र हे सातही जण मध्यमवर्गीय कुटुंबांतील असून ही शिक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे बेस्टच्या ठरलेल्या प्रक्रियेनुसार ही शिक्षा कमी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या सातही जणांना पुन्हा अपील करता येऊ शकते. ती प्रक्रिया तातडीने राबवून एक महिन्याच्या आत माधवी जुवेकरसह सातही कर्मचारी पुन्हा कामावर कसे परत येतील याची दक्षता घ्या, असेही आदेश मी दिले आहेत- आशीष चेंबूरकर, बेस्ट समितीचे अध्यक्ष