रंगदेवता

शीतल तळपदे

तुमची मैत्रीण – रंगभूमी

तिच्यातली सकारात्मक गोष्ट – सकारात्मक ऊर्जा

तिच्यातली खटकणारी गोष्ट – कोणतीच नाही

तिच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट – मला मिळालेली प्रसिद्धी. कारण एका पडद्यामागच्या कलाकाराला नाव मिळणं, जगात त्याचं नाव पोहोचणं हीच सुंदर भेट आहे.

रंगभूमीकडून काय शिकलात ?- नाटक कसं उभं करायचं आणि ते प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचवायचं हे रंगभूमीकडूनच शिकलो.

या माध्यमाबाबत कधी प्रतिकूलता जाणवली का? – नाही. माझं स्वतःचं असं काहीच नाही. जे आहे ते सगळं तिनेच दिलेलं आहे, असं मानतो.

 कमेकांसाठी वेळ देता का ? – हो, द्यायलाच लागतो. त्याशिवाय नाटक होऊच शकत नाही.

रंगभूमीसोबतचा अविस्मरणीय क्षण – मला पुरस्कार मिळाले हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं, कारण पुरस्कार ही प्रेक्षकांच्या पसंतीची पावती आहे.

तुम्ही चुकता तेव्हा रंगभूमी काय करते – तेव्हा ती मला शिकवते. विचार करायला लावते. असं करायला नको होतं. पुढच्या वेळी सुधारणा कर, असं सांगते. कारण प्रत्येक नाटकात सगळं बरोबर होतं असं नाही. ही प्रक्रिया सुरू असते म्हणून त्याला आपण प्रयोग म्हणतो.

तिचं वर्णन कसं कराल? – मैत्रिणीपेक्षाही ती मला एक देवता वाटते. तिने कायम मला आशीर्वाद दिला आहे. माझी लहानपणापासूनची आवड तिच्यामुळे जोपासली गेली. त्याचं भरभरून माप तिने माझ्या पदरात टाकलंय. खरं तर मी कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करत आलो, पण या मैत्रिणीमुळे मला सर्वेत्कृष्ट नाटकं करता आली, बघता आली.

तुमची एखादी तिला न आवडणारी सवय – मी आळशी आहे.

तुमच्या दृष्टीने मैत्रीची व्याख्या?- कोणतीही अपेक्षा न ठेवता भरभरून देत राहाणं. रंगभूमीने माझ्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता मला दिलंय.

तुम्हाला कशी हसवते? – कधी कधी नाटक माझ्या बाजूने फसतंही… तेव्हा हे करून बघ. नावीन्य जोपास असं सुचवते.

एकत्र पाहिलेले नाटक? – ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘ढॅण्टढॅण्ड’, नवीन नाटकांमध्ये ‘हा शेखर कोसला कोण आहे?’, ‘पती गेले गं काठेवाडी’, ‘संगीत मत्स्यगंधा’, ‘व्यक्ती आणि वल्ली’.

तिच्याशी मैत्री का करावीशी वाटली? – माझे मित्र नाटकात काम करायचे. मला नाटकात घ्यायचे नाहीत. तेव्हा मला वाईट वाटायचं. मग मी शाळेत नाटक बसवणाऱया शिक्षकांना मला नाटकात का घेतलं नाही, असं विचारायचो. नाटकाचं मला आकर्षण होतंच. त्यातून रंगभूमीशी मैत्री झाली.