मुंबईकरांचा आता गारेगार ‘बेस्ट’ प्रवास, 200 एसी बसेससह 450 बसेसची खरेदी

47

सामना प्रतिनिधी । मुंबई

बेस्ट प्रशासनाने 450 नव्या बसेसची खरेदी करण्यासाठी पावले उचलली असून त्यात 200 मिनी एसी बसचा समावेश असल्याने वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. बेस्टने खासगी सहभागातून 450 बस घेण्याचा निर्णय घेतला असून त्यात 200 मिनी एसी, 200 नॉन एसी आणि 100 नॉन एसी मिडी बसेसचा समावेश आहे.

नवी मुंबईसह आजूबाजूच्या महापालिकांच्या परिवहन सेवेच्या ताफ्यात हायफाय वातानुकूलित बसेसचा ताफा असताना सध्या बेस्टकडे वातानुकूलित बसेसची तशी वानवाच आहे. केवळ बीकेसीत काही मोजक्या मार्गावर एमएमआरडीएचे सहकार्य घेत बेस्टची वातानुकूलित बससेवा सुरू आहे. त्यामुळे शहर व उपनगरातील मुंबईकरांचा प्रवास गारेगार करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने 450 बसेसच्या खरेदीकरिता दोन खासगी कंत्राटदारांची निवड केली आहे. बेस्ट उपक्रम आणि कर्मचारी युनियनमधील परस्पर सामंजस्य करार कालच मान्य झाल्याने या बसेस येण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यातील 25 टक्के बस पुढील तीन महिन्यांत, 50 टक्के बस चार महिन्यांत आणि उर्वरित 25 टक्के बस पाचव्या महिन्यात सामील होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या कंपन्यांना कंत्राट…!
या सर्व बसेस डिझेल इंजिनच्या असून अँथनी गॅरेजेस आणि श्री कृपा सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपन्यांना त्यासाठी कंत्राट देण्यात आले आहे. करारानुसार या बसचा ड्रायव्हर खासगी कंपनीचा राहणार असून केवळ कंडक्टर हा बेस्टचा कर्मचारी असणार आहे. त्यामुळे बेस्टच्या प्रत्येक बसमागील खर्चात प्रति कि.मी. नऊ रुपयांपेक्षाही जास्त बचत होईल असे सांगितले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या