सावधान, बाजारात प्लास्टिकची अंडी आली आहेत…

49

सामना ऑनलाईन । कोलकाता

बाजारात कृत्रिम तांदूळ किंवा कृत्रिम कोबी आल्याच्या बातम्यांनी धुमाकूळ घातला होता. पण, आता बाजारात प्लास्टिकची अंडी आली आहेत. कोलकात्यातल्या एका महिलेला अशाच एका अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे.

कोलकात्यात राहणाऱ्या अनिता नामक महिलेने बाजारातून १२ अंडी आणली होती. आपल्या एक वर्षाच्या मुलाला जवळ जवळ महिनाभर त्या अंडी खाऊ घालत होत्या. मात्र, त्यांच्या मुलाची तब्येत सुधारण्याऐवजी बिघडली होती. डॉक्टरांनाही मुलाची तब्येत बिघडण्याचं कारण कळत नव्हतं. या घटनेनंतर जेव्हा अनिता यांनी ऑमलेट बनवण्यासाठी
अंड फोडलं तेव्हा त्यांना हे अंड वेगळं असल्याचं जाणवलं. त्यांनी नीट तपासून पाहिलं असता, अंड्याचं कवच प्लास्टिकचं असल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं. तेव्हा अनिता यांना त्यांच्या मुलाच्या बिघडलेल्या तब्येतीबाबत उलगडा झाला.


या प्लास्टिकच्या अंड्याचं कवच इतर अंड्यांहून थोडं वेगळं होतं. त्यामुळे अनिता यांनी ते कवच जाळून पाहिलं असता प्लास्टिक जळल्यासारखा वास येऊ लागला. शिवाय, खऱ्या अंड्याच्या कवचापेक्षा या कृत्रिम अंड्याचं कवच पातळ असल्याचंही अनिता यांच्या लक्षात आलं. त्यांनी त्वरीत नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी अंडीविक्रेत्या दुकानदाराची चौकशी सुरू केली आहे. कोलकात्याच्या महापौरांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित दुकांनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जे या कारवाईमध्ये दोषी आढळतील, त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशाराही महापौरांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या