भगतसिंह यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा?

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवत फाशी देण्यात आलेल्या महान क्रांतिकारक भगतसिंह यांच्याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. भगतसिंह यांच्यावर ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येचा आरोप लावण्यात आला होता त्या अधिकाऱ्याची हत्या त्यांनी केली नव्हती, असा दावा पाकिस्तानमधील एका वकिलाने केला आहे. इम्तियाज रशीद कुरेशी असे या पाकिस्तानी वकिलाचे नाव आहे. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकाला न्याय मिळवून देण्यासाठी या वकिलाने पाकिस्तानच्या उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.

कुरेशी यांनी लाहोर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये, भगतसिंह यांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे. तसेच हिंदुस्थानचे तुकडे होऊ नये यासाठी भगतसिंह लढत होते, असे म्हटले आहे. सरकारने पुनरावलोकन आणि सुव्यवस्थेचे सिद्धांत वापरून भगतसिंह यांची या आरोपातून सुटका करावी, अशी विनंती याचिकेमध्ये करण्यात आली आहे.

लाहोर पोलिसांनी २०१४ मध्ये न्यायालयाच्या आदेशावरून अनारकली पोलीस स्थानकामधील १९२८मधील साँडर्स हत्या प्रकरणातील प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) शोधून काढला. न्यायालयाच्या आदेशान्वये या अहवालाची प्रत अॅड. कुरेशी यांना देण्यात आली आहे. हा अहवाल उर्दू भाषेत लिहिण्यात आला असून अनारकली पोलीस स्टेशनमध्ये १७ डिसेंबर १९२८ रोजी सायंकाळी ४.३० मिनिटांनी ‘दोन अज्ञात बंदुकधारी’ यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. त्यावेळी या गुन्ह्यातील आरोपींवर ३०२, १२०१ आणि १०९ कलमे लावण्यात आली होती. या एफआयआरमध्ये भगतसिंह यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, तरीही त्यांना या हत्येच्या गुन्ह्यामध्ये फासावर लटकवण्यात आले, ही गोष्ट दुर्दैवी असल्याचे कुरेशी यांनी म्हटले आहे.

अॅड. कुरेशी हे लाहोरमध्ये भगतसिंह मेमोरिअल फाऊंडेशन चालवतात. कुरेशी यांनी सोमवारी लाहोर उच्च न्यायालयात भगतसिंह यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. गेल्या वर्षीही त्यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी लाहोर उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यांत पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांना विनंती करीत अॅड. कुरेशी यांच्या याचिकेवर सुनावणीसाठी खंडपीठातील न्यायाधीशांची संख्या वाढवावी अशी विनंती केली होती.

ब्रिटीश सरकारच्या काळात २३ मार्च १९३१ रोजी वयाच्या २३ व्या वर्षी भगतसिंह यांना लाहोर येथील तुरुंगात फाशीची शिक्षा देण्यात आली होती. भगतसिंह यांच्यावर ब्रिटीश सरकारविरोधात कट-कारस्थान रचल्याचा आणि भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांनी मिळून ब्रिटीश अधिकारी जॉन पी. साँडर्स याची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.