भगवद्गीता ही आईने मुलाला सांगितलेले तत्त्वज्ञान

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

भगवद्गीता हा ग्रंथ विश्वाला मार्गदर्शक ठरणार ग्रंथ आहे, गीता हाच ग्रंथ आईने मुलाला सांगितलेले तत्त्वज्ञान आहे, असे विचार पांडुरंगशास्त्री आठवले प्रेरित वैश्विक स्वाध्याय परिवाराच्या मार्गदर्शक धनश्री तळवलकर (दीदी) यांनी व्यक्त केले.

गीतेच्या विचाराचे लोकशिक्षण घडावे म्हणून गीता जयंती वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येतात, मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर ‘गीता तेजाचे दर्शन, मानव मूल्य संवर्धन’ या विषयावर गीता जयंती विभागीय अंतिम वक्तृत्व स्पर्धा रविवारी पार पडली, या स्पर्धेत मराठवाड्यासह बुलढाणा, यवतमाळ, नागपूर आदी जिल्ह्यांतील १६ स्पर्धक सहभागी झाले होते, त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात धनश्री तळवलकर बोलत होत्या.

कृष्ण जगतगुरू आहेच, यात दुमत नाही, परंतू आपण म्हणतो तसेच ते जगतगुरू आहेत का? असा प्रश्न उपस्थित करून धनश्री तळवलकर पुढे बोलताना म्हणाल्या, गीता हे तेजाचे दर्शन आहे, पण डोळे उघडे नसतील तर तेज दिसेल कसे, त्यासाठी डोळे उघडे ठेवले पाहिजे, भगवद् गीता, कृष्णावर आपले प्रेम आहे, गीताचे शब्दार्थ सांगून गीता उचलली जाणार नाही, जगात अनेक तत्वज्ञान आहे, जगात तत्त्वज्ञानीही आहेत, त्यांना वाटते, हिंदुस्थानात तत्त्वज्ञानच नाही, त्यांना तत्वज्ञ म्हणून फक्त शंकराचार्यच दिसतात, गीता हे मोठे तत्त्वज्ञान आहे, देवाला हे तत्त्वज्ञान सांगण्यासाठी दीड तास लागला, यामध्ये ७०० श्लोक आहेत, आता तेच सांगण्यासाठी आपणास अनेक वर्ष घालवावे लागतील. तरीही गीता कठीण नाही! ते तत्त्वज्ञान आहे असे म्हणत गीता कानोड्यात ठेवली जाते हे चूकच आहे. गीता, नारळ आणि श्रीफळ देऊन रिटायर्ड मंडळीची सोय केली जाते, मात्र म्हातारपणी नव्हे तरुण वयात आयुष्याची सुरुवात करतानाच गीतेची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.

माणसाला माणूस म्हणून उभे केले पाहिजे, हे नमूद करून धनश्री तळवलकर म्हणाल्या, प्राणी, पक्ष्यांपेक्षा मनुष्य हा वेगळा आहे, पण त्याला चिंतेने ग्रासले आहे, या चिंतेमुळेच तो स्वार्थात गुरफटत जात आहे, यातून बाहेर पडण्यासाठी त्याने तत्त्व आणि स्वत्त्व ही मूल्ये जपली पाहिजेत, ही मूल्ये जपली नाही तर प्राणी-पक्ष्यांपेक्षा तो वेगळा आहे, असे म्हणता येणार नाही. प्राणी-पक्षी घरटे बांधतात, मानव हा बिल्डिंग बांधतो, पक्ष्यांचे वेस्टनातून बांधलेले घरटे बेस्ट राहते. मात्र मानवाने बांधलेली बिल्डिंग कोसळते, हा स्वार्थाचा भाग आहे, या लक्षात घेतले पाहिजे. त्यासाठी जीवनात तत्त्वज्ञान हवेच, तडजोडीने काम चालत नाही, असेही त्या म्हणाल्या. यावेळी शिवसेने उपनेते खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, बंडू ओक, नगरसेविका कीर्ती शिंदे यांच्यासह अन्य मान्यवरांनी धनश्री तळवलकर यांचा सत्कार करून दर्शन घेतले. प्रारंभी युवा-युवतींनी धनश्री दीदींना भाववंदना-नृत्यवंदना दिली. स्वाध्याय परिवाराच्या या कार्यक्रमाने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान खचाखच भरले होते.