१० ग्रामपंचायतींवर फडकला भगवा

सामना प्रतिनिधी, मंडणगड

दापोली तालुक्यात होत असलेल्या ३० ग्रामपंचायत निवडणुकांतील १२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवडही बिनविरोध झाली असून तालुक्यातील १० ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा निर्विवाद भगवा फडकला असल्याचा दावा युवासेना राज्य कार्यकारिणी कोअर कमिटी सदस्य योगेश कदम यांनी आज सायंकाळी दापोली शहरात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.

या पत्रकार परिषदेला माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, महिला आघाडी संघटक दीप्ती निखार्गे, माजी सभापती श्रीपत पवार, माजी उपसभापती उन्मेश राजे, माजी जि. प. सदस्य राजेंद्र फणसे-पवार, सुनील दळवी, योगेश कदम यांचे स्वीय सहाय्यक स्वप्नील पाटील, शिवसेना नगरसेवक सुहास खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दापोली तालुक्यात ३० ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता त्या कार्यक्रमातील निवडणूक अर्ज मागे घेण्याचा आज अंतिम दिवस होता. निवडणूक जाहीर झालेल्यांपैकी १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून त्यातील १० ग्रामपंचायती शिवसेनेच्या निर्विवादपणे ताब्यात आल्या असल्याचा दावा युवासेनेचे राज्याचे कार्यकारी कोअर कमिटी सदस्य योगेश कदम यांनी केला आहे. दापोली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अंतिम दिवस होता. तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून त्यातील १२ ग्रामपंचायतींची बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली त्यातील २ ग्रामपंचायती या गाव पॅनलच्या निवडून आल्या आहेत.

खेदाची बाब म्हणजे राष्ट्रवादी-भाजपला एकही ग्रामपंचायत ताब्यात मिळविता आली नाही. शिवसेनेने मिळविलेला विजय हा शिवसेनेच्या सांघिक संघटनात्मक कामाचा असून शिवसेनेने गावागावात केलेल्या विकासकामाला लोकांनी उत्स्फूर्तपणे साद दिली असून त्याचेच हे प्रतीक असल्याचे योगेश कदम यावेळी म्हणाले.

शिवसेनेचे १० सरपंच बिनविरोध
१० ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये अंकुश गणपत देसाई (ग्रामपंचायत् पाचवली), गीता गणपत खांडेकर (ग्रामपंचायत करंजाणी), सारिका चंद्रकांत खळे (ग्रामपंचायत कोळबांद्रे), दर्शना दत्ताराम पवार (ग्रामपंचायत आगरवायंगणी), अशोक गंगाराम कदम (ग्रामपंचायत देगाव), विजय काशीनाथ नाचरे (ग्रामपंचायत भडवळे), गंगाराम कृष्णा हरावडे (ग्रामपंचायत दमामे), सुनीता चंद्रकांत आग्रे (ग्रामपंचायत उंबर्ले), कल्याणी विनोद ईवलेकर (ग्रामपंचायत वेळवी), सुरेश भिकू वडतकर (ग्रामपंचायत विरसई) या ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे तर शिरसाडी आणि सडवे ग्रामपंचायती गावपॅनल पुरस्कृत सरपंच उमेदवारांची निवड झाली आहे.