लक्ष्मीनारायण बोल्ली

>>भगवान परळीकर<<

महाराष्ट्राच्या मराठी मातीत गेली ५० वर्षे साहित्याची सेवा करणारे डॉ. कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे सोलापुरात हृदयविकाराने निधन झाले. कवी लक्ष्मीनारायण बोल्ली हे तेलुगू आणि मराठी साहित्यातील दुवा होते. केवळ मराठीच नव्हे तर आंध्र प्रदेशातील नामवंत कवी, साहित्यिक अशीही त्यांची ओळख महाराष्ट्राला होती. मूळचे आंध्र प्रदेशातील पद्मशाली समाजाचे असलेले बोल्ली कुटुंबीय व्यवसायाच्या निमित्ताने सोलापुरात आले आणि स्थायिक झाले. त्यांचे वडील स्व. इरप्पण्णा बोल्ली यांचे सोलापूरच्या सहकार क्षेत्रात मोठे योगदान होते. पिढीजात यंत्रमाग व्यवसाय असला तरी डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे मात्र मन साहित्यातच रमले आणि त्यांनी साहित्य शारदेची अखेरपर्यंत उपासना केली. ही उपासना करीत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.  प्रकाशनाच्या वाटेवर असलेल्या ‘क्षण एक पुरे प्रेमाचा’ या राम गणेश गडकरी या ललित चरित्राचे ते लेखन करीत होते. या पुस्तकाचे मुखपृष्ठही तयार झाले होते. या साहित्यकृतीवर अखेरचा हात फिरवत असतानाच लेखन टेबलावरून पट्टी खाली पडल्याने ते वाकले, वाकून पट्टी उचलत असताना त्यांना हृदयविकाराचा तीक्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. जगणे सुंदर आहे, मरणे सुंदर आहे, जगण्या-मरण्यामधील उरणे सुंदर आहे, असे सांगत जगण्याबरोबरच मरण्यावरही प्रेम करणाऱ्या मराठी साहित्य रसिकांच्या या कवीचे अखेर निधन झाले. कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली हे ७५ वर्षांचे होते. पत्नी नाटय़ कलावंत शोभा बोल्ली, नरेश आणि शरद ही दोन मुले, मुलगी असा त्यांचा परिवार आहे. कविता, बालकविता, कादंबरी, चरित्रग्रंथ, एकांकिका, नाटय़ अनुवाद असे साहित्याचे विविध प्रकार लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी हाताळले. मातृभाषा तेलुगू होती. तेलुगूमधील अनेक साहित्याचे त्यांनी मराठीत अनुवाद केले. मैफल (काव्यसंग्रह), झुंबर (काव्यसंग्रह), सावली (काव्यसंग्रह), विरहिणी वासवदत्ता (काव्यनाटय़), गवाक्ष (ललित), तेलुगू फुलांचा मराठी सुगंध (तौलनिक), लक्ष्मीनारायण बोल्लीच्या कविता (संपादित काव्यसंग्रह), एका साळियाने (आत्मचरित्र), गवताचे फूल (बालकविता संग्रह), गीत मार्कंडेय (गीतसंग्रह), कवितराय रामजोशी (कादंबरी), दक्षिण भाषेतील रामायणे (तौलनिक अभ्यास), कृष्णदेवराय (कादंबरी), कवितेचा आत्मस्वर दत्ता हलसगीकर (ललित चरित्र), अभंग कलश (वचनानुवाद), पंचपदी (तेलुगू कथांचा अनुवाद), संत वेमना (तेलुगू वचनांचा अनुवाद), यकृत (नाटय़ानुवाद), कमलपत्र (चरित्रानुवाद), राजर्षी शाहू छत्रपती (तेलुगू चरित्र), रात्रीचा सूर्य (खंडकाव्यानुवाद), स्वर-लय (हिंदुस्थानी संगीतकारांचा वेध) अशी आजवर त्यांची वीसहून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. यात तेरा स्वतंत्र तर सात मराठीत अनुवादित केलेली आहेत. माणसाला एकापेक्षा अधिक भाषा अवगत असल्यास तो जास्त प्रगल्भ होतो अशी त्यांची धारणा होती. आज भाषेच्या नावाने जो वितंडवाद घातला जात आहे त्याबद्दल ते अनेक वेळा खंत व्यक्त करीत. अवघे दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या कवी लक्ष्मीनारायण बोल्ली यांची पुस्तके मात्र विद्यापीठांच्या एमएच्या अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आली आहेत. तेलुगू मराठीच्या तौलनिक अभ्यासाची दखल घेत हैदराबादच्या पोट्टीश्रीरामलू तेलुगू विद्यापीठाने त्यांना डी.लिट. ही पदवी  तत्कालीन राज्यपाल सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान केली होती. महाराष्ट्र शासनाचा उत्तम वाङ्मय लेखक महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरिका साहित्यरत्न पुरस्कार, भैरुरत्न दमाणी पुरस्कार, कवी कुंजविहारी आदी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. अखिल भारतीय कुमार साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलनात तसेच तेलुगू साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सहभाग होता. सोलापूरच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राला कवी लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली होती. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या साहित्य क्षेत्रात अखंडपणे कार्यरत असलेला तेलुगू आणि मराठी साहित्यातील जाणकार कवी हरपला आहे.