पाटण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भगवंत लोहार, नितीन खैरमोडे उपाध्यक्ष

सामना प्रतिनिधी । पाटण

2018-19 या वर्षासाठी पाटण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक ऐक्याचे भगवंत लोहार, उपाध्यक्षपदी दै. ऐक्यचे नितीन खैरमोडे व दै. सागरचे दिनकर वाईकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी दै. ऐक्यचे श्रीकांत पाटील, सचिवपदी दै. मुक्तागिरीच्या विद्या म्हासुर्णेकर-नारकर, सहसचिवपदी तरूण भारतचे सुरेश संकपाळ यांच्या निवडी करण्यात आल्या. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.

जिल्हा प्रतिनिधी म्हणून जालिंदर सत्रे, राज्य प्रतिनिधी म्हणून विठ्ठल चव्हाण तर कार्यकारिणीमध्ये पाटण विभाग प्रमुख प्रकाश कांबळे, (पाटण), रामचंद्र कदम, (मोरगिरी), योगेश हिरवे, (मल्हारपेठ), जयभीम कांबळे (ढेबेवाडी), एकनाथ माळी (तारळे), राजकुमार साळुंखे, (चाफळ), दिनकर वाईकर, (कोयनानगर) यांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे पाटण तालुका पत्रकार संघाची वार्षिक बैठक येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. प्रारंभी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, तामिळनाडुचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी तसेच भारत मातेचे संरक्षण करताना धारातीर्थ पडलेले वीर जवान यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच मुलींना पळवून नेण्याची भाषा करणारे भाजपाचे उन्मत आ. राम कदम व त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी एबीपी माझा या न्युज चॅनेलच्या महिला वृत्त निवेदीकांना अश्लिल भाषा वापरून धमकी देणाऱ्यांचा बैठकीत जाहीर निषेध करण्यात आला. तद्‌नंतर बैठकीत पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष शंकरराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी निवड पार पडली. पत्रकार संघामार्फत गत वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रम व कामकाजाची माहिती शंकरराव मोहिते यांनी दिली.

निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष भगवंत लोहार म्हणाले, कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता पत्रकारसंघाच्या उन्नतीसाठी सातत्याने एक पाऊल पुढे टाकले आहे. कोणतेही काम करण्यासाठी मनात तळमळ आणि इच्छा लागते. पाटण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने माझ्यावरची जबाबदारी निश्चितच वाढली आहे आणि ती जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांना बरोबर घेवून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सचिव भगवंत लोहार यांनी मागील बैठकीचा वृत्तांत वाचून दाखविला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी अध्यक्ष शंकरराव मोहिते, माजी उपाध्यक्ष संभाजी भिसे यांच्यासह पत्रकारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बैठकीस पाटण तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य, ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.