भालाफेक

बाळ तोरसकर,[email protected]

भालाफेक करणे हे एक उत्कृष्ट योद्धय़ाचे प्रमुख कार्य असे. रामायण, महाभारत व अगदी छत्रपती शिवाजी महराजांच्या काळातसुद्धा युद्धात भाल्याचा वापर होत असे.

या वर्षी सुरू झालेल्या जकार्ता येथील आशियाई स्पर्धेत (18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर) हिंदुस्थानचा आघाडीचा भालाफेक खेळाडू नीरज चोपडाला उद्घाटनीय कार्यक्रमात हिंदुस्थानचा ध्वज वाहक होण्याचा मान मिळाला आहे. देशासाठी काहीतरी करून दाखवण्यासाठी सर्वच खेळाडू धडपडत असतात व त्यातून जे खेळाडू उज्ज्वल कामगिरीची नोंद करतात अशाच खेळाडूंना असा मान मिळतो. खरेतर प्रत्येक खेळाडू हा मान मिळवायला नेहमीच उत्सुक असतो. हा क्षण खेळाडूच्या आयुष्यात खूपच महत्त्वाचा असतो. अशा एखाद्या प्रोत्साहनात्मक संधीने खेळाडूच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणीदेखील मिळून जातो. खेळांसाठी असलेली हिंदुस्थानातील लोकांची मानसिकता ही फारच चिंताजनक आहे. हिंदुस्थानात खेळांसाठी खूप काम होणं गरजेचं आहे. खरेतर हिंदुस्थानातील लोक खेळांना जेव्हा डोक्यावर घेतील तेंव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदकतालिकेत आपण हिंदुस्थानचे नाव खालून वर न पाहता वरुण खाली पाहू लागू. नीरज चोपडाला जो मान प्राप्त झालाय त्या भालाफेक खेळाची माहिती आपण या लेखात पाहू…

भालाफेक करणे हे एक उत्कृष्ट योद्धय़ाचे प्रमुख कार्य असे. पूर्वी भालाफेकीवर अनेक युद्धे जिंकल्याचे दाखले इतिहासात सापडतात. रामायण, महाभारत व अगदी छत्रपती शिवाजी महराजांच्या काळातसुद्धा युद्धात भाल्याचा वापर होत असे. महाभारतातील ज्येष्ठ पांडव युधिष्ठर भालाफेक करण्यात पारंगत होता हे आपल्याला माहीत असेलच. युद्धात भालाफेक करताना अतिशय सावध राहावे लागते. भालाफेकीत भालफेक करणाऱयाचा अचूक नेम व एकाग्रता समोरच्या सैन्याचा अचूक वेध घेत असे. असा हा युद्धप्रकार या आधुनिक काळात मात्र एक खेळ म्हणून पुढे आला आहे. भालाफेक खेळाचा समावेश ऍथलीट प्रकारात झाला असून त्याचा समावेश 1908 सालापासून ऑलिंपिकमध्येसुद्धा झाला आहे.

भालाफेक हा खेळ खेळाडूची एकाग्रता व तेज बुद्धीला आव्हान देणारा खेळ आहे. या खेळात खेळाडूला त्याचे लक्ष साध्य करताना नेहमीच मन व चित्त शांत ठेवत आपला निशाणा साधावा लागतो. या खेळातील मुख्य साधन म्हणजे भाला. हा भाला मुख्य तीन भागात विभागाला जातो. एक म्हणजे जो मुख्य भाग तो म्हणजे भाल्याचे टोक वा ज्याला पूर्वी भाल्याचा फाळ म्हणत. दुसरा भाग म्हणजे भाल्याची दांडी व तिसरा भाग म्हणजे भाल्याच्या दांडीला हातात धरण्याचा भाग ज्याला मूठ म्हणता येईल. भाल्याचे टोक धातूपासून बनवलेले असते व ते गोलाकार त्रिकोणी व निमुळते असते. हे धातूचे टोक 25 ते 33 सेंटीमीटर लांबीचे असते. भाल्याची दांडी ही बांबू अथवा धातूची असते. भाल्याची एकूण लांबी 2.60 ते 2.70 मीटर असते. तर भाल्याची दांडी हातात पकडण्यासाठी दांडीच्या मध्यावर दोरी गुंडाळून एक छानशी व मजबूत पकड वा मूठ तयार केली जाते व साधारणपणे ती 15 ते 16 सेंटीमीटर इतकी असते. ही दांडी मध्यभागी जाड व दोन्ही टोकांकडे निमुळती होत जाते.

भालाफेक करणारा खेळाडू तीस ते छत्तीस मीटर लांबीच्या पट्टीतून धावत येत भालाफेक करतो. साधारण चार मीटर अंतरावर दोन समांतर रेषा आखतात व नंतर 8 मीटर त्रिजेने दोन समांतर टोकांना पोहचेल असा कंस आखतात व त्यावर धातूची वा लाकडाची कड जमीन पातळीवर बसवावी. तिची जाडी सात सेंटीमीटरपेक्षा जास्त असून चालणार नाही व त्याला पांढऱया रंगाने रंगवून जमीन पातळीवर पक्की करतात. भालाफेक करण्यासाठी खेळाडूला त्याची एकाग्रहता व जोरदार व नियंत्रित धाव खूपच महत्त्वाची ठरते. त्यानंतर केलेली भालाफेक ही ठरविलेल्या व आखून दिलेल्या क्षेत्रातच होणे फारच महत्त्वाचे असते. भालाफेक करताना ती फेक ‘क्रॅच लाईन’च्या मागून करावी लागते. ही रेषा ओलांडली तर मात्र ती भालाफेक बाद ठरवली जाते. भाला पकडण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असून त्यापैकी अमेरिकन पकड व फिनीश पकड प्रसिद्ध आहे. यात अंगठा व तर्जनी यांच्या विळख्यात भाला धरून फेक करतो त्याला अमेरिकन पकड असे म्हणतात तर फिनीश पकडीत मध्यभागी तोल राहावा म्हणून दोरीने गुंडाळलेल्या जागी म्हणजे पकड मूठ अंगठा व मधले बोट यांनी पकडून तिरकस तळव्याच्या पोकळीत भाला धरून जोरदारपणे फेकला जातो.

जर आपण व्यावसायिक भालाफेक खेळाडू होऊ शकलो नाही तरी हा खेळ खेळल्याने काय फायदे होऊ शकतात हे पाहू. भालाफेक खेळाचा सराव केल्याने व त्यासाठी करावे लागणारे व्यायाम केल्याने आपल्या शरीरात प्रचंड ताकद तर निर्माण होतेच. त्याशिवाय आपले चित्त एकाग्र होते. आपले लक्ष नेहमीच गोग्य त्या दिशेने काम करू लागते. हातात व पायात प्रचंड ताकत निर्माण होते. आपण नेहमी तंदुरुस्त राहू शकतो व आपल्या आयुष्यात नेहमीच कार्यरत राहण्याची उमेद आपल्याला शांत बसू देणार नाही. त्यामुळे आपण नेहमीच योग्य त्या दिशेने काम करून आपले आयुष्य यशस्वी करू शकतो.