पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ विरोधकांचा आज ‘हिंदुस्थान बंद’

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात येणार असून, त्यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. कार्यकर्त्यांनी बंद शांततेत पार पाडावा, असे आवाहन विरोधकांनी केले आहे.

  • 21 राजकीय पक्षांचा बंदला पाठिंबा
  • सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद
  • बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळल्या

गणपती स्पेशल एसटी बसेस आज दुपारनंतर सुटणार

हिंदुस्थान बंदच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईतून कोकणसह इतर भागात जाणाऱया एसटी महामंडळाच्या गणपती उत्सवाच्या जादा बसेसची खास काळजी घेतली जाणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सकाळी निघणाऱया एसटी बसेस दुपारी तीन नंतर सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशभक्तांनी कोणतीही काळजी करू नये, असे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे. सोमवार दि. 10 सप्टेंबर रोजी मुंबई व ठाणे विभागातून 350 जादा बसेस सुटणार आहेत. एसटी महामंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात दोन हजारांहून अधिक जादा बसेसची व्यवस्था केली आहे.

काँग्रेसने पुकारलेल्या या बंदला अनेक राज्यातील चेंबर्स ऑफ कॉमर्स, कामगार संघटना, शैक्षणिक संस्था तसेच समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, माकपा, भाकपा, धर्मनिरपेक्ष जनता दल, राष्ट्रीय लोकदल, झारखंड मुक्ती मोर्चा यांनी पाठिंबा दिला आहे.

तृणमूल काँग्रेस, डाव्या पक्षांनी काँग्रेसने पुकारलेल्या बंदला पाठिंबा दिला आहे. मात्र प्रत्यक्ष हे पक्ष बंदमध्ये सहभागी होणार नाहीत. तृणमूलने आपले कार्यकर्ते महागाईच्या विरोधात निदर्शने करतील पण आम्ही काँग्रेससोबत नाही, असे स्पष्ट केले. डाव्या पक्षांनीही ‘राष्ट्रीय हरताळ’ पाळण्याचे जाहीर केले आहे.