भिवंडीत डिझेलचोरांच्या टोळीचा पर्दाफाश


सामना ऑनलाईन । ठाणे

भारत पेट्रोलियम कंपनीच्या इंधनवाहिनीमध्ये छिद्र पाडून डिझेल चोरी करणाऱया टोळीच्या मुसक्या नारपोली पोलिसांनी आवळल्या आहेत. तसेच चोरीचे डिझेल विकत घेणाऱया रोहा, सोलापूर, संभाजीनगर येथील पेट्रोलपंप मालकांनाही बेडय़ा ठोकल्या आहेत. आतापर्यंत अटक केलेल्या 11 आरोपींकडून चोरीला गेलेल्या डिझेलची 19 लाख 46 हजार रुपयांची रक्कम तसेच 50 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान या प्रकरणातील आणखीन पाच आरोपी फरार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे. भिवंडीत भारत पेट्रोलियम कंपनीची मुंबई-मनमाड डिझेल, पेट्रोलवाहिनी फोडून त्यातून टँकरद्वारे डिझेलचोरी झाल्याचे निदर्शनास येताच पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱयांनी नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.