नांदेड : भारतीय कामगार सेनेचे बेमुदत कामबंद आंदोलन

2

सामना प्रतिनिधी । नांदेड

एमजीएमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणे, त्यांच्या नियमबाह्य बदल्या करणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी न करणे याच्या निषेधार्थ आज भारतीय कामगार सेनेच्या एमजीएम युनिटच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

नांदेडच्या एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. यातील 11 शिक्षक, कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून, चार शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या करण्यात आल्याा आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेसंदर्भात कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला असताना त्याचीही पूर्तता करण्यात आली नाही. याबाबत वारंवार निवेदनेही देण्यात आली होती. मात्र 17 जानेवारी रोजी एमजीएमच्या पदाधिकाऱ्यांनी तुम्ही आंदोलन करु नका, काही तरी तोडगा काढू, असे आश्वासन दिले व या प्रक्रियेसाठी काही वेळही देण्यात आले. त्यावेळी हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. एमजीएम महाविद्यालयातील मनमानी, प्राध्यापकांना कामावरुन कमी करणे, त्यांना अपमानास्पद वागणूक देणे, विनाकरण बदल्या करणे हे प्रकार वाढत असल्याने 14 फेब्रुवारीपासून महाविद्यालयाच्या गेटसमोर भारतीय कामगार सेनेच्या एमजीएम युनिटने कामबंद आंदोलन सुरु केले आहे. आज या आंदोलनाला प्रारंभ झाला असून, यावेळी कर्मचाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील, असे भारतीय कामगार सेनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.