रा.स्व.संघाशी निगडीत कामगार संघटनेचे २० फेब्रुवारीला देशव्यापी आंदोलन

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत कर्मचारी संघटननेने २० फेब्रुवारी रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणांमुळे हे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचं भारतीय मजदूर संघातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. फेब्रुवारीतच होणाऱ्या राष्ट्रीय कामगार परिषदेवर बहिष्कार घालण्याबाबतही या संघटनेचा सध्या विचार सुरू आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाची हात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधूनच देण्यात आली आहे.

गुजरातेतील अंबाजीमध्ये भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची ८ फेब्रुवारी रोजी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये २० फेब्रुवारी हा काळा दिवस म्हणून पाळण्यात यावा असं आवाहन या संघटनेशी निगडीत सगळ्या कामगारांना करण्यात आलं आहे. या दिवशी सगळे कामगार काळ्या फिती लावून गेटसभा आयोजित करणार आहेत. भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीने आरोप केला आहे की केंद्र सरकारने १७ नोव्हेंबर २०१७ रोजी दिलेली आश्वासन पाळलेली नाहीयेत. मोदी सरकारला कामगारांची अजिबात काळजी नसल्याने आपण आंदोलनाचा हत्यार उपसत असल्याचं संघातर्फे सांगण्यात आलं आहे.

३ वर्षांच्या अवकाशानंतर नवी दिल्लीत २६ आणि २७ फेब्रुवारीला राष्ट्रीय कामगार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे, या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. या दोन्ही दिवशी परिषदस्थळासह गल्लीपासून दिल्लीपर्यंत उग्र आंदोलन करण्याचे निर्देश भारतीय मजदूर संघाने सगळ्या कामगारांना दिले आहेत. मध्यमवर्गानेही कामगारांच्या या आंदोलनाला पाठिंबा द्यावा यासाठी ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लावू नये अशी मागणी या संघटनेने केली आहे.