कुठे गेले हे नि:स्वार्थी आत्मे?

  • द्वारकानाथ संझगिरी

या देशात अस्सल ‘पोलादी पुरुष’ एकच होते ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल! एकसंध हिंदुस्थान त्यांनी ज्या मुत्सद्दीपणे केला त्याला तोड नाही. कुठल्याही जखमा फारशा न चिघळवता त्यांनी सोमनाथाचं मंदिर उभारलं आणि तिथली मशीद इतरत्र हटवली. खरं तर फाळणीच्या जखमा त्यावेळी भळभळत होत्या. त्यावर खपलीसुद्धा भरली नव्हती, पण जातीय वणवा जाऊ दे, फारशा ठिणग्याही न पेटता सोमनाथ उभं राहिलं.

जिथे सोमनाथाचं मंदिर उभं आहे त्या भागाचं नावं आहे प्रभासपाटण. तो त्यावेळी जुनागढ संस्थानचा भाग होता. त्याचा राजा मुस्लिम होता. प्रजा प्रामुख्याने हिंदू होती. राजाने पाकिस्तानात जायचं ठरवलं. सरदारांनी त्याचं राज्य हिंदुस्थानात आणले. १२ नोव्हेंबर १९४७ ला हिंदुस्थानी सैन्य जुनागडमध्ये आले. सरदार तिथे होते. त्याचवेळी सरदारांना सोमनाथ मंदिराच्या पुनर्जन्माच्या प्रसूतिवेदना जाणवल्या. त्यांनी ही गोष्ट महात्माजींना सांगितली. त्यांनीही आनंद व्यक्त केला. ते फक्त म्हणाले, ‘‘मंदिराची उभारणी सरकारी तिजोरीतून करू नका. भक्तांकडून पैसे उभारा. सुरुवात माझ्याकडून करा.’’ नेते प्रथम स्वतःच्या खिशात हात घालत. मग जनतेकडे हात पसरत. ही गोष्ट किती पुरातन झालीए पहा, पण नंतर गांधीजी-पटेल दोघेही जग सोडून गेले. मग के. एम. मुन्शी या नेहरू सरकारमध्ये मंत्री असलेल्या सज्जनाने मंदिर पूर्ण केलं. हे इतक्या सहज घडलं नाही.

नेहरूंच्या निधर्मीवादाच्या व्याख्येत सरकारने मंदिर उभारणी करणं बसत नव्हतं. किंबहुना त्यांना अप्रत्यक्ष सरकारी मदतही अपेक्षित नव्हती, पण नेहरूंची एक गोष्ट चांगली होती. एकेकाळी ते इतके लोकप्रिय होते की, सहज हुकूमशहा होऊ शकले असते, पण ते लोकशाहीवादी होते. त्यांनी आपलं वैयक्तिक मत गांधीजी गेल्यावरही आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांवर लादलं नाही. त्यांच्या मंत्रिमंडळातल्या दोन मंत्र्यांचा हे मंदिर उभारण्यात वाटा आहे. एक मुन्शी, दुसरे गाडगीळ. त्यांना गांधीजींच्या कल्पनेप्रमाणे लोकांच्या पैशांतून पैसे उभारण्यात त्यांनी आडकाठी केली नाही. त्यांनी त्याकडे हिंदू पुनर्जीवनवाद म्हणून पाहिलं आणि रस घेतला नाही. गांधीजींना सरकारच्या अप्रत्यक्ष सहकाराबद्दल आक्षेप नव्हता. कारण ते मूलतः आंतरबाह्य हिंदू होते. ते सश्रद्ध होते. त्यांची निधर्मीवादाची व्याख्या नेहरूंपेक्षा वेगळी होती.

एका पत्रकाराने महात्माजींना विचारलं, ‘‘सरकारी मदत का नकोय?’ ते म्हणाले, ‘‘मग इतर धर्म, इतर देवळांनाही सरकारी तिजोरीतून पैसे देणं न्यायाचं होईल. त्याचे वाईट दूरगामी परिणाम होतील म्हणून नको.’’ सुबुद्ध त्यांच्या या विधानाशी असहमत होणार नाहीत. त्या काळात एका धर्मांध आणि खुनशी मुस्लिम लेखकाने लिहिलं, ‘‘सोमनाथाचं पुनर्निर्माण करताय. मग गझनवीतून ते लुटायला नवा गझनीही येऊ देत.’’ गांधीजींनी त्यांच्या प्रार्थना सभेत सांगितलं, ‘‘गझनीने केलं ते चुकीचं होतं. इस्लामिक राजांनी जे अत्याचार केले ते चुकीचे होते हे मुसलमानांनी मान्य करायला हवे. पाप मान्य करण्याने मन जास्त साफ होतं. जर मुसलमानांनी मुलांना गझनवीचा धडा शिकवला तर कुठला हिंदू तो मान्य करील.’’ हे कागदोपत्री आहे. माझं मत नाही. गांधीजींची ही बाजू कधी व्हॉट्स ऍपवर आलेली नाही.

१९५० साली जुन्या मंदिराचा ढाचा पाडला. मशीद काही किलोमीटर पुढे बांधली आणि १९५१ साली मंदिर पूर्ण झाले. नव्या मंदिराचा पायाचा दगड राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांनी बसवला. तद्नंतर ते म्हणाले, ‘‘मंदिराचा ढाचा उभा राहिला म्हणजे मंदिर उभं राहिलं नाही. जुन्या मंदिराच्या ऐतिहासिक काळात जी समृद्धी देशात होती तशी समृद्धी शहरात दिसेल तेव्हा खऱ्या अर्थाने ते मंदिर उभं राहील. सोमनाथ मंदिराने नेहमी दाखवून दिलंय की, विध्वंसाच्या ताकदीपेक्षा नवनिर्माणाची ताकद मोठी असते.’’ खरंच, सोमनाथ मंदिराच्या इतिहासाचं एका वाक्यात त्यांनी वर्णन केले. त्यावेळची ही थोर थोर माणसं बहुधा वेगळ्याच ग्रहावरून आलेली असावीत किंवा स्वर्गातल्या एखाद्या अफलातून खाणीतून! आता त्या खाणीला टाळं लागलं असावं. पायाभरणी समारंभ हे राजकीय हिशेब चुकवण्यासाठी असतात याची त्यांना कल्पनाही नव्हती.

आजचं सोमनाथाचं मंदिर चालुक्य शैलीच्या स्थापत्य कलेप्रमाणे तयार केलंय. सोमपुराचे गवंडी प्रसिद्ध आहेत. त्यांची ती कलाकृती आहे. या मंदिराची उंची आता १५५ फूट आहे. आजच्या भाषेत सांगायचं तर १५ मजली इमारत! तिथे एक फलक आहे. त्यावर बाण दाखवलाय. तो बाण स्तंभ आहे. तो एक अद्भुत गोष्ट दाखवतो. सोमनाथ मंदिराच्या जागेपासून थेट अंटार्क्टिकापर्यंत मध्ये फक्त समुद्र आहे. जमीन नाही. मंदिराचा कळस दहा टनांचा आहे आणि वरच्या झेंड्याची काठी तब्बल ३७ फुटांची आहे.

तुम्हाला मूर्तिकला, शिल्पकलेची आवड असेल तर मंदिरात भरपूर वेळ तुम्ही घालवू शकता. देवळाच्या माध्यमातून काही कला कशा विकसित होत गेल्या आणि काही परंपरा कशा ताठ मानेने पुढे सरकल्या हे कळतं. मंदिरात अर्थातच गर्भगृह किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर गाभारा आहे. छतावर पेंटिंग्ज आहेत. पूर्वी तिथे हिरे-माणकं असतं. त्यामुळेच तर ते देऊळ लुटलं गेलं. गझनी तर वाट पाहायचा कधी एकदा मंदिर हिरे-माणिकांनी सुशोभित होतंय आणि आपण ते लुटतोय. गझनी साम्राज्याचा खर्च सोमनाथ मंदिराच्या लुटीवरच झाला असावा, पण आजही जुन्या आठवणी जागा व्हाव्यात असं सोमनाथचं गर्भगृह आहे. सोन्याच्या पत्र्याने सजवलेलं! भिंती, देव्हारा, दरवाजे, भांडी यांना सोन्याचा मेकअप चढवलाय. या मेकअपसाठी सोनं कुणा मुंबईच्या भक्तानं दिलं. त्याने शंभर किलो सोनं दान केलं. देवाला श्रीमंतीत ठेवायचा आपला हा अट्टहास असा सातत्याने सुरू असतो. एरवी साधेपणाने राहणारा शंकर सोनेरी पिंजऱ्यात गुदमरत नाही का? खरंच कधी देव, येसू, अल्ला वगैरे कुणी मला भेटलं तर त्याला भक्तांच्या या औदार्याबद्दल काय वाटतं हे त्याच्याकडून ऐकायला आवडेल. आमच्या गोव्यात एका देवळात माझ्या बायकोला सरळ सांगितलं होतं, ‘‘देवीला साडी फक्त सिल्कची नेसवता येईल. सुती वगैरे स्वीकारल्या जातील, पण देवीला नेसवता येणार नाही. त्या भटजींना देवीने स्वप्नात दृष्टांत देऊन मला फक्त सिल्कची साडी हवीय असं सांगितलं होतं का?’’

असो, आपण डोळ्यात सौंदर्य साठवून ठेवून जास्त डोकं न चालवता, तिथल्या पायऱ्यांवर बसावं. वारा इतका जोरात वाहत होता की, उडून जाण्याची भीती वाटली. तिथला समुद्रही सुंदर आहे. उधळलेला घोडा, पळणारा चित्ता, कडाडणाऱ्या विजा आणि खवळलेला सोमनाथचा समुद्र यात एक साम्य आहे ते म्हणजे थरकाप उडवणारं सौंदर्य. तो अंगावर झेपावणारा समुद्र. तो मुळासकट उचलणारा वारा तुम्हाला भिववितो, पण ते सौंदर्य डोळ्यांत साठवून घरी घेऊन जायला त्या शंकरासारखा आणखी एक डोळा असावा असं वाटतं.

एक विसरलो, मंदिरात शिरताना वाटेतलं कलादालन पहा. जुन्या देवळाच्या भग्नावशेषांची पेंटिंग्ज, दगडात कोरलेली शिल्पं, त्यातून सोमनाथचा इतिहास चितारण्याचा प्रयत्न सुंदर आहे. कधी जुनं वैभव पाहत, कधी जुन्या जखमांनी विव्हळत आपण मंदिरात शिरतो.

१९२२ साली के. एम. मुन्शी सोमनाथच्या भग्न मंदिरात गेले होते. ते भग्न मंदिर पाहून त्यांचे हृदय विदीर्ण झालं. मोडकळीस आलेल्या सभामंडपात एका इन्स्पेक्टरनं कुत्रं बांधलं होतं. पालीसरडे घर हक्काचं असल्याप्रमाणे फिरत होते. तेव्हा स्वातंत्र्याच्या स्वप्नाबरोबर त्यांनी सोमनाथलाही दुर्दशेतून स्वतंत्र करण्याचे स्वप्न पाहिले. सरदार पटेल, महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवला आणि कुठलीही राजकीय महत्त्वाकांक्षा मनात न ठेवता मंदिर पूर्ण केलं.

कुठे गेले ते निःस्वार्थी आत्मे?

[email protected]