भीमा कोरेगाव दंगलीचे पडसाद – डोंबिवलीत दगडफेक, रास्ता रोको

सामाना ऑनलाईन । डोंबिवली

भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी बांधवांवर दगडफेक आणि हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत डोंबिवलीतील तरुणही जखमी झाले. त्यामुळे या घटनेचे पडसाद सोमवारी रात्री डोंबिवलीत शेलार नाका येथे उमटले. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रात्री साडेदहाच्या सुमारास मोठा जमाव जमला होता. त्या जमावाने रास्ता रोको करत दगडफेकही केली. अखेर पोलिसांनी संतप्त जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. सध्या वातावरणात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

भीमा कोरेगाव येथील घटनेची माहिती रात्री दहा साडेदहाच्या सुमारास डोंबिवलीत समजल्यानंतर सुमारे १०० ते १५० नागरिक शेलार नाका येथे जमले. या जमावाने निषेधाच्या घोषणा देत रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेटस टाकून रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतुकीची काहीकाळ कोंडी निर्माण झाली होती. पोलीस नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत होते. मात्र जमाव शांत होत नसल्याने अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. राहुल ढोंले, विजय तोरणे, गोरख धांगडय़ा, परशा वाघमारे हे तरुण जमावाला भडकावत असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.