संभाजीनगरात हवेत गोळीबार, पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

भीमा-कोरेगाव येथे झालेल्या वाहनांवरील दगडफेकीच्या घटनेचे संभाजीनगरात आज दुसऱ्या दिवशी तीव्र पडसाद उमटले. ठिकठिकाणी आक्रमक झालेल्या जमावाकडून पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करीत दगडफेक सुरू केल्यामुळे शहरात चार ठिकाणी हवेत गोळीबार करण्यात येऊन जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. सध्या शहरात प्रचंड तणावाचे वातावरण झाले असून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

भीमा-कोरेगाव येथे अभिवादनाला जाणाऱ्या वाहनांवर समाजकंटकांनी दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली. या घटनेचे तीव्र पडसाद संभाजीनगरसह मराठवाड्यात उमटले आहेत. आक्रमक जमावाने दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करून दोन वाहने पेटवली. आज मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आक्रमक जमावाला पांगविण्यासाठी टि.व्ही. सेंटर चौक, रांजणगाव शेणपुंजी, रमानगर, पीरबाजार या ठिकाणी हवेत गोळीबार करण्यात येवून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.

सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी शहरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. शहरात बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आल्यामुळे पालकांची एकच धावपळ उडाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे आज मंगळवारी होणारे पेपर आणि प्रात्यक्षिक पुढे ढकलण्यात आले. सार्वजनिक वाहतूक बंद झाल्याने रस्त्यावर शुकशुकाट पसरला असून हजारो प्रवासी रेल्वे स्टेशन, बसस्थानकांवर अडकले आहेत. शहरातील क्रांतीचौक, कॅनॉट गार्डन, सिडको, निराला बाजार, टीव्ही. सेंटर, हर्सुल, हडको, मुकुंदवाडी, एकनाथनगर, गुरूगोंविंदसिंग पुरा, वाळूज, पंढरपूर, बजाजनगर, जोगेश्वरी, सातारा, देवळाई, शिवाजीनगर, शिवशंकर कॉलनी, सूतगिरणी चौक, गजानन महाराज मंदिर चौक, जालना रोड, छावणी, भिमनगर-भावसिंगपूरा, जयभवानी नगर, सिडको बसस्थानक, आकाशवाणी चौक, अमरप्रितचौक, बाबा पेट्रोलपंप, संभाजीपेठ, सिद्धार्थनगर,आंबेडकर नगर या भागात वाहनांवर दगडफेक झाली असून संपूर्ण व्यवहार बंद करण्यात आल्याने तणावाचे वातावरण आहे. जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तांच्या गाडीवर दगडफेक
प्रभारी पोलीस आयुक्त मिलींद भांबरे यांच्या वाहनावर टीव्ही सेंटर चौकात दगडफेक झाली. तसेच शेकडो वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बीड शहरातील विद्यानगर, सरकारी रुग्णालय, तहसील कार्यालय, आंबेडकर भवन येथे दगडफेक करण्यात येऊन आठ वाहने फोडण्यात आले. जिल्ह्यातील माजलगाव, बीड, गेवराई, येथे बंद पाळण्यात आला. माजलगावात रात्री बसेसवर दगडफेक करण्यात आली. बुलढाणा शहरात दोन बस व खासगी रुग्णालयावर दगडफेकीची घटना घडली. जालना येथेही वाहनांवर दगडफेक झाली.