भीमा-कोरेगाव प्रकरणावरून राज्यात भडका, मुंबईतही उद्रेक!

सामना प्रतिनिधी । मुंबई

पुण्याच्या भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणावरून आज राज्यभरात आंदोलनाचा भडका उडाला. संतप्त बौद्ध बांधवांनी ठिकठिकाणी रास्ता रोको केला. मुंबईतही उद्रेक झाला. घाटकोपर, चेंबूर, मुलुंड अक्षरश: पेटले होते. बौद्ध आंदोलकांनी महामार्ग रोखले. बसेस पेटवल्या. वाहनांची तोडफोड केली. रेल रोको करून लोकल वाहतूक ठप्प पाडली. सरकारविरुद्ध तीक्र निदर्शने केली. दरम्यान, भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून भारिप बहुजन महासंघाने उद्या बुधवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.

पोलिसाचा डोळा फुटला

दगडफेकीत बेस्ट बसची फुटलेली काच चेंबूर पोलीस ठाण्याचे दीपक खेडकर यांच्या डोळ्याला लागली.

सहायक पोलीस आयुक्त जयराम मोरे हे जमावाला पांगवताना पडले. त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले.

भीमा-कोरेगावमध्ये काय घडले?

भीमा-कोरेगावच्या रणसंग्रामाला ३१ डिसेंबरला २०० वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्त हजारो बौद्ध बांधव भीमा-कोरेगाव, सणसवाडी येथील विजयस्तंभाला अभिवादन करायला गेले होते. त्यांच्यावर काहींनी दगडफेक केल्याने हिंसाचार उसळला होता. त्यात अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. त्या हिंसाचारात एका तरुणाचाही मृत्यू झाला.

शाळा-कॉलेज सुरू राहणार; स्कूलबस बंद

आंदोलनकर्त्यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली असली तरी शाळा-कॉलेज सुरूच राहणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कूलबस बंद ठेवण्याचा निर्णय ओनर्स असोसिएशनने घेतला आहे.

दलित-मराठा वाद पेटवण्याचा कट उधळून लावा

आंबेडकरी जनतेवर भीमा-कोरेगाव येथे झालेला हल्ला हा दलित-मराठा वाद पेटवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे. दलित-मराठा दोन्ही समाज छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे आहेत. एकमेकांशी लढून ताकद वाया घालवू नका. या दोन्ही समाजांनी शांतता आणि संयम पाळून दलित-मराठा संघर्षाचा कट उधळून लावावा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. भीमा-कोरेगावमधील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा, अशी मागणीही आठवले यांनी केली.

दरम्यान, उद्या बुधवार दि. 3 जानेवारी रोजी रिपब्लिकन पक्षातर्फे मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांवर भीमा-कोरेगाव येथे आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई रिपाइंने दिली.

आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद मुंबई-ठाण्यासह महाराष्ट्रात उमटत आहेत. मात्र हे आंदोलन शांततेतच व्हायला हवे, असे सांगून डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या निषेधार्थ उद्या, बुधवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. सर्व प्रकरणात सरकार ज्या पद्धतीने वागत आहे त्याचा निषेध म्हणूनच हा ‘महाराष्ट्र बंद’ असेल असे आंबेडकर म्हणाले.

भिडे-एकबोटेंच्या कार्यकर्त्यांनीच हिंसाचार भडकवला!

संभाजी भिडे यांची शिव प्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे यांच्या हिंदू एकता आघाडीच्या कार्यकर्त्यांनीच हिंसाचार भडकवला, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हजारो बौद्ध आंदोलक रस्त्यावर महामार्ग रोखले… बसेसची जाळपोळ वाहनांची तोडफोड, रेल रोको
मंगळवारी दुपारी आंदोलकांनी चेंबूर स्थानकात घुसून रेल रोको केले. पोलिसांनी हुसकावून लावलेले आंदोलक पुन्हा ट्रकवर आल्याने तब्बल ६ तास वाहतूक ठप्प झाली.

हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी

भीमा-कोरेगाव येथील हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची हत्याच झाली असून त्याची सीआयडी चौकशी होईल, असेही त्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी आज तातडीने एक विशेष बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भीमा-कोरेगाव येथे सहा ते सात लाख लोक जमले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांच्या सहा कंपन्या तैनात करण्यात आल्या होत्या. पोलिसांच्या सतर्कतेमुळे दंगल नियंत्रणात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणा

ज्या वाहनांची जाळपोळ झाली त्यांच्या मालकांना नुकसानभरपाई देणार.

मृताच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून १० लाखांची मदत देणार.