नक्षलसमर्थकांना मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवायचा होता!

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

भीमा-कोरेगावमध्ये उसळलेली दंगल आणि त्याआधी आयोजित करण्यात आलेली एल्गार परिषद या प्रकरणी पोलिसांनी देशभरात नक्षलसमर्थकांवर कारवाई केली आहे. देशभरात टाकण्यात आलेल्या छाप्यांनंतर ५ नक्षलसमर्थकांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने आज प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून यामध्ये संबंधित मंडळींना मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवायचा होता असं म्हटलं आहे.

महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की कोर्टासमोर जे प्रकरण आहे त्यातील आरोपी हे कम्युनिस्ट पक्षाचे(माओवादी) सक्रीय सदस्य आहेत. हे सगळे जण नुसते कट रचत नव्हते तर स्वत: मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकावण्याच्या, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याच्या आणि समाजात अस्वस्थता निर्माण करण्याच्या तयारीत होते.