आठवले म्हणतात, भीमा-कोरेगाव दंगल व एल्गार परिषदेचा संबंध नाही…

सामना प्रतिनिधी । नगर

आंबेडकरवाद्यांनी नक्षलवादी बनू नये तसेच नक्षलवाद्यांना आंबेडकरवादी म्हणू नये, असे रामदास आठवले म्हणाले. तसेच शांतीच्या मार्गाने सर्वांनी जायला पाहिजे, अशी आपली भावना आहे. जे नक्षलींचे काम करत आहेत त्यांच्यावरच कारवाई केली जात आहे. मीसुद्धा अनेक वेळेला संघर्ष करून मत मांडलेली आहेत म्हणून मला कोणी नक्षलवादी ठरवलेले नाही. बाळासाहेब आंबेडकरांचा नक्षलवाद्यांशी संबंध नाही, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले. ते नगर येथे बोलत होते.

एल्गार परिषदेने दंगा केलेला नाही
भीमा-कोरेगाव दंगल व एल्गार परिषदेचा काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले. एल्गार परिषदेने दंगा केलेला नाही. दलितांवर हल्ला झाल्याने दंगा झाला, असे सांगून ते पुढे म्हणाले की, संभाजी भिडे गुरुजींच्या संदर्भात पुरावे मिळालेले नाहीत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. आम्ही त्यांना पुन्हा पुरावे तपासा अशी मागणी केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही असेही ते म्हणाले.

… म्हणून एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांचे अटकसत्र नाही
दाभोळकर प्रकरणात सनातनच्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरू केल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. दोन्ही घटना वेगवेगळ्या असून पोलिसांना मिळालेल्या पुराव्यांनुसार ही कारवाई सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विचारवंतांना न पकडता नक्षलवाद्यांना पकडावे, असे ते म्हणाले.

हिंदुत्ववाद पुढे येतोय असा कोणताही विषय नाही. हिंदूंच्या आवाजाला सरकार प्रोत्साहन देते, असेही कुठे घडलेले नाही. ‘उलट सबका साथ, सबका विकास’ हा मोदींनी दिलेला नारा असून ते दलित-मुस्लिम सर्व घटकांना बरोबर घेऊन विकास साधत आहेत, असेही आठवले यांनी सांगितले.