२२ मिनिटे… २०० मोबाईल… एकच संदेश… ‘मी विक्रोळीला अडकलोय’

सामना ऑनलाईन । मुंबई

सिग्नल पडला… गाडी सुटेल असे वाटत होते… पण बराच वेळ झाल्यानंतरही गाडी पुढे सरकत नव्हती. डब्यात प्रत्येक जण मोबाईलवर बोलत होता. मेसेज पाठवत होता. व्हॉट्सऍप चेक करत होता. नेट सर्च करत होता. प्रत्येकाला माहीत होते की, सकाळपासून विविध ठिकाणी आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे; पण संध्याकाळीही त्यात आपली लोकल सापडेल याची कल्पना मात्र नव्हती. तीसुद्धा अडकून बसली होती घाटकोपर आणि विक्रोळीच्या मधोमध. तब्बल २२ मिनिटे. त्यादरम्यान डब्यात सुमारे २०० मोबाईल फोनवर प्रत्येक जण समोरच्याला सांगत होता…‘मी विक्रोळीला अडकलोय.’

कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱया लोकलमधील ही आजची कथा. पाच-सवापाचच्या सुमारास ती ठाण्यापर्यंत आली होती. राज्यभरात आंबेडकरी अनुयायांनी आंदोलने करून वाहतूक रोखल्याची चर्चा लोकलमध्ये सुरूच होती. तरीही गाडी विक्रोळीपर्यंत सुरळीत आल्याने पुढेही तशीच जाईल असे वाटत होते. पण विक्रोळी स्थानक सोडल्यानंतर गोदरेजच्या आसपास लोकलला सिग्नल पडला.

घाटकोपर स्थानकात गडबड सुरू असल्याने लोकल थबकल्या अशी चर्चा डब्यातल्या गर्दीत सुरू होती. ती खरी आहे की अफवा याची शहानिशा करण्यासाठी मग अनेक जण मोबाईलवर मित्रमंडळींना संपर्क साधत होता. काहींनी लाइव्ह टीव्ही सुरू केला होता आणि आसपासची चार डोकी त्यात उत्सुकतेने डोकावत होती. २२ मिनिटे सिग्नल कायम होता. मुंबईसारख्या ठिकाणी लोकलला २२ मिनिटांचा सिग्नल म्हणजे काही मोठी गोष्ट नाही; पण बाहेर सर्वत्र आंदोलन पेटले असताना ती रुळावर थबकली यामुळेच प्रत्येकाच्या मनात भीती दाटली होती. घाटकोपरपर्यंत लोकल रडतकुडतच पण न थांबता आली. त्यानंतर मात्र ती लोकल सुरळीतपणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला रवाना झाली.