दिवसभर ना पाणी ना अन्नाचा कण!

सामना ऑनलाईन । मुंबई

घाटकोपर येथील रमाबाईनगर, कामराजनगर, नालंदानगरातील हजारो भीमसौनिकांनी पूर्व द्रूतगती मार्गावर उतरत वाहतूक रोखून धरली. वाहतूककोंडी सायंकाळपर्यंत न फुटल्याने वाहनांत अडकून पडलेल्या चाकरमान्यांबरोबरच वाहनधारकांना दिवसभर ना घोटभर पाणी मिळाले ना अन्नाचा कण… दरम्यान, भिमा-कोरेगाव येथील घटनेला सर्वस्वी मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार असल्याचे सांगत भीमसैनिकांनी ‘फडणवीस सरकार मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद’च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.

अनिरुद्ध साळवी या मराठी तरुणाने आपल्या कंपनीच्या कामासाठी अंधेरीहून ऐरोलीला जाण्याकरिता सकाळी ११ वाजता रिक्षा पकडली. पण रास्तारोकोमुळे सात तास झाले रमाबाईनगर येथेच अडकून पडलोय. मीटरनुसार दीड हजार रुपये भाडे झाले, आता ते कसे देणार, माझ्या पगाराला परवडणार का, असा सवाल अनिरुद्धने केला.

व्यावसायिक कामासाठी दुपारी ३.३० च्या विमानाने दिल्लीला निघालो होतो. त्यासाठी ओला कॅब बुक केली. मात्र सकाळपासून रमाबाईनगरच्या कोंडीत अडकून पडल्याचे विक्राळीच्या प्रवीण वर्मा यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी रमाबाईनगरात यावे

वाहतूककोंडी सोडवण्यासाठी अप्पर पोलीस आयुक्त लखीम गौतम यांनी दहा जणांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला घेऊन जाण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र आंदोलनकर्त्यांनी तो झुगारत मुख्यमंत्री जनतेपेक्षा मोठे आहेत का, त्यांनी रमाबाईनगरात येऊन चर्चा करावी, अशी मागणी केली.

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करा!

संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनीच भीमा-कोरेगाव येथील हल्ला घडवून आणला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, याबाबतचे निवेदन ज्येष्ठ दलित कार्यकर्ते डॉ. हरीश आहिरे, डी.एम. चव्हाण यांनी पोलिसांना दिले.

मुलुंडमध्ये शुकशुकाट

मुलुंडमध्ये स्टेशन रोड, तांबेनगर, केशवपाडा, डम्पिंग रोड या परिसरातील दुकाने बंद होती. सर्वत्र शुकशुकाट होता. दुपारपर्यंत मुलुंडमध्ये चारवेळा मोर्चा काढण्यात आला. १०० ते १५० आरपीआय कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी रास्ता रोको केला.