भीमा-कोरेगावप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना ‘सर्वोच्च’ दिलासा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भीमा-कोरेगाव आंदोलनप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले हिंदू एकता आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २० फेब्रुवारीला होणार असून तोपर्यंत एकबोटे यांना दिलासा मिळाला आहे.

याआधी मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावला होता. त्यामुळे मिलिंद एकबोटे यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता वर्तवण्यात येत होती. बुधवारी न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर एकबोटे यांनी अटक टाळण्यासाठी ताबडतोब दुसऱ्या खंडपीठाकडे धाव घेतली होती. मात्र या खंडपीठाकडून देखील त्यांना दिलासा मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती.