मी वेगळी, समाजाचं ऋण

>>भीमाबाई विश्वासराव

घर, संसार सांभाळणारी मी एक सर्वसामान्य स्त्री. पण आज मी एक समाजसेविका व मार्गदर्शक आहे. शाळेपासूनच मला समाजकार्याची आवड होती, पण लग्नानंतर संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना समाजकार्याला पुरेसा वेळ देणे कठीण होते. पण त्यातही मी समाजकार्य सुरू ठेवले. मी राहत असलेल्या ठिकाणी कुठलीही समस्या असोत, माझ्या परीने समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करते. गरजवंतांना मार्गदर्शन करण्याचे कामही मी करत आहे. महत्त्वाचे म्हणजे माझा मुलगा व पती मला समाजकार्यासाठी पाठिंबा देतात. समाजकार्यातून मला लोकांचे जे आशीर्वाद मिळतात ते मला नेहमीच काहीतरी चांगले करण्याची ताकद देत असतात. प्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी वेगळेपण दडलेले असते. पण घर व संसाराच्या धावपळीत अनेकजणी स्वतःला ओळखणेच विसरून जातात. तेव्हा प्रत्येक स्त्रीने घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःला वेळ दिला पाहिजे. त्याचबरोबर स्त्रीने स्वतःला ओळखून सिद्ध केले पाहिजे. कारण जोपर्यंत स्त्री स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत तिच्यातील वेगळेपण तिला उमगणार नाही.

प्रत्येकीचं स्वतःचं असं वेगळेपण असतं. आपलं करीयर, छंद, घर, संसार, नवरा, मुलंबाळं… या साऱ्यांच्या पलीकडे… फक्त ते गवसणं आवश्यक असतं. अंतर्मुख होऊन थोडा स्वतःच शोध घेतला की ते वेगळेपण सापडतं. तुमच्यातील हे वेगळेपण शोधायला ‘श्रीमती’ही तुमच्या मदतीला आली आहे. चला तर मग… लेखणी उचला आणि तुमच्या स्वतःतील वेगळेपण फोटोसहीत आम्हालाही कळवा. वेगळ्या वेगळेपणास नावासहित प्रसिद्धी मिळेल.

आमचा पत्ता ः श्रीमती, शेवटचे पान, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा [email protected] या ईमेलवरही पाठवता येईल.