पुत्रप्रेमापोटी तिने विकत घेतले चोरीचे बाळ, ‘आशिक’च्या अपहरणकर्त्याला बेड्या

119

सामना ऑनलाईन । भिवंडी

धामणकर नाका उड्डाणपुलाखालून आईच्या कुशीतून चोरलेल्या अवघ्या एक वर्षाच्या आशिकची दहा दिवसांनंतर गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिट दोनने उत्तर प्रदेशातून सुटका केली आहे. बाळ नसलेल्या महिलेसाठी या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुत्रप्रेमापोटी या महिलेने आरोपींकडून बाळ विकत घेतल्याचे समोर आले असून आशिकला सुखरूप पाहताच त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

भिवंडी येथील धामणकर नाका येथील उड्डाणपुलाखाली आशिक त्याच्या आई-वडिलांसह राहतो. 3 जूनला पहाटे चार वाजेच्या सुमारास आईच्या कुशीत झोपलेल्या आशिकला रोहित कोटेकर (23) याने उचलून नेले. या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून भिवंडी युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या पथकाने रोहितला अटक केली. मात्र बाळ त्याच्याकडे आढळले नाही. पोलिसांनी त्याच्यासह त्याचा साथीदार सूरज सोनी (24) याला अटक केली. तेव्हा त्याने आशिकला 50 हजारांना विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या माहितीचा तपास घेत पोलीस उत्तर प्रदेशला पोहोचले. तेथून त्यांनी एका महिलेच्या ताब्यात असलेल्या आशिकची सुटका केली.

चोरट्यांच्या कृष्णकृत्यांचा थांगपत्ता नाही
काही वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर महिलेला बाळ दत्तक हवे असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी आरोपी रोहितला दिली होती. त्यानुसार रोहितने आशिकची चोरी करून ते बाळ ‘त्या’ महिलेला दिले. मात्र प्राथमिकदृष्टय़ा तिला याबाबत माहितीच नसल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. आरोपींनी तिला हे बाळ अनाथ आश्रमातून आणल्याची थाप मारली होती.

आपली प्रतिक्रिया द्या