नोटाबंदी, जीएसटीमुळे कर्जात बुडालेल्या सिनेनिर्मात्याची आत्महत्या

सामना ऑनलाईन । भाईंदर

नोटाबंदी आणि जीएसटीमुळे फायनान्सरनी हात आखडता घेतल्यामुळे कर्जात बुडालेला भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक शमशाद अहमद जवाद शेख ऊर्फ शादजी यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

शमशाद अहमद जवाद शेख हे मीरा रोड येथील लोढा कॉम्प्लेक्समधील न्यू सलोनी हाईट्स या इमारतीत पत्नीसह राहात होते. त्यांनी चार ते पाच भोजपुरी चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. तसेच दोन भोजपुरी सिनेमांची निर्मिती केली होती. स्वर्ग हा त्यांची निर्मिती असलेला भोजपुरी सिनेमा काही दिवसांतच रिलीज होणार होता. तसेच भोजपुरी गायक व नायक अरविंद अकेला ऊर्फ कल्लूजी याला घेऊन त्यांनी ‘तुम्हारे प्यार की कसम’ या चित्रपटाची निर्मितीही सुरू केली होती. हा चित्रपटही अंतिम टप्प्यात पोहोचला होता; परंतु गेल्या वर्षभरात आधी नोटबंदी आणि नंतर जीएसटीचा फटका बसला. त्यांच्या फायनान्सरने हात आखडता घेतला. त्यामुळे ते कर्जात बुडाले होते. आर्थिक कोंडी झाल्यामुळे अखेर शमशाद अहमद जवाद शेख यांनी घरातील पंख्याच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केली.