सातपुड्यातील भोंगऱ्या होळी

भारत काळे, जळगांव

फाल्गुन महिना सुरू होताच सातपुडा पर्वतराजीला होलिकोत्सवाचे वेध लागतात. रोजगाराच्या निमित्ताने बाहेर पडलेले आदिवासी बंधू-भगिनी आपापल्या गावी परततात. ’पावरा’ आदिवासींच्या जीवनात होळी या सणाला अनन्यसाधारण महत्व असते. या होलीकोत्सवाची सुरुवात ’भोंगऱ्या’ बाजाराने होते. सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेल्या आदिवासींना पळसाची फुले बहरताच या निसर्ग होळीची चाहूल लागते.

holi-jatra

‘भोंगऱ्या’ हा होळी सणाच्या अगोदर येणारा व आदिवासींमध्ये विशेष लोकप्रिय असलेला ‘बाजार’ (जत्रा) होय. दहा ते बारा आदिवासी पाड्यांच्या मध्यवर्ती भागातातील एका गावात हा बाजार सर्वानुमते भरविला जात असतो. प्रत्येक आदिवासी पाड्यांचे प्रमुख ज्यांना आदिवासी भाषेत मुखिया म्हणतात ते नदी काठी एकत्र येऊन बाजार भरविण्याबाबत निर्णय घेत असतात. होळी सणाअगोदर एक दिवस निश्चित करून बाजाराचा दिवस ठरविला जातो. बाजारात खरेदीसाठी आदिवासींची एकच झुंबड उडते.

भोंगऱ्या बाजारात पारंपारिक वेशभूषेत लाखोंनी दाखल झालेल्या आदिवासींनी रंगीबेरंगी वस्त्रे, चांदीचे दागिने, मोरपिसांचा टोप,कंबरेला बांधावयाचे लहान-मोठे घुंगरु, टोपली, वाद्ये आदी वस्तूंची खरेदी करण्यासाठी एकच गर्दी करतात. त्याचवेळी ढोल, मांदल,थाळी, बासरी, झांज, आदी पारंपारिक वाद्यांच्या तालावर लहान मुलांपासून तर वृध्दांपर्यंत ’पावरा’ नृत्यावर थिरकणारी पाऊले हृदयाचा ठाव घेतात व डोळ्यांचे पारणे फेडतात.  होळीपूर्वी ठिकठिकाणी आयोजिला जाणारा हा भोंगऱ्या बाजार हे देखील या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले आहे.

माघ महिन्यापासून होते होलिकोत्सवाला सुरूवात

पावरा आदिवासींच्या या होलिकोत्सवाचा प्रारंभ होतो तो माघ पौर्णिमेपासून. गावाच्या मध्यभागी होळीचा दांडा उभारला जातो व या उत्सवाला सुरूवात होते. गावागावातून फाग म्हणजे देणगी गोळा करण्यास प्रारंभ होतो. भोंगऱ्या बाजारात वर्षभराची खरेदी केली जाते. विशेष म्हणजे माघ पौर्णिमेपासून ते फाल्गुन पौर्णिमेपर्यंत, होलिकोत्सवाची सांगता होईपर्यंत मुली पाहणे, लग्न जमविणे व करणे यासाठी हा काळ अशुभ मानला जातो. एकप्रकारे या प्रथांवर ‘बॅन’ असला तरी विवाहेच्छूक आदिवासी तरुण-तरुणी या बाजारात एकमेकांचा परिचय करुन घेतात व पसंती झाल्यास पुढे ते प्रथेप्रमाणे विवाहबद्ध होतात. ही प्रथा हळूहळू लोप पावत चालली आहे की काय? अशी स्थिती अलिकडच्या काळात निर्माण होऊ लागली आहे. मात्र या प्रथेतून आदिवासींचा प्रगल्भपणा जाणवल्याशिवाय राहत नाही.

२ राज्यातील आदिवासी एकत्र साजरी करतात होळी

holi-dholपावरा आदिवासींच्या जीवनात दिवाळी किंवा इतर सणांपेक्षाही होलिकोत्सवाचे महत्व अधिक असते. होळीच्या दिवशी तर त्यांच्या उत्साहाला उधाण येते. मोठे व अवाढव्य ढोल (मांदल), थाळी, बासरी, झांज आदी पारंपारिक वाद्यांच्या तालावर आदिवासी बंधू-भगिनी बेभान होऊन नाचत असतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदनला दुपारी पारंपारिक पद्धतीने नवस फेडण्याची प्रथा आहे. होळीच्या निखाऱ्यातून अनवाणी चालत हा नवस फेडला जातो. महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर, अनेर नदीच्या काठावर वसलेल्या वैजापूरच्या होलिकोत्सवात दोन्ही राज्यातील हजारो पावरा आदिवासी नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी होतात. अशा प्रकारे होलिकोत्सवामुळे आदिवासी ताजेतवाने होतात व वर्षभर पुन्हा आपल्या संघर्षमय जीवनाला सामोरे जाण्यासाठी सज्ज होतात.

अशा जमतात अन् तुटतात ‘रेशीमगाठी’

holi-danceभोंगऱ्या बाजारात मुलास मुलगी किंवा मुलीला मुलगा पसंत पडला तर पंच बसवून त्यांचा विवाह ठरविला जातो. गोलाकार बैठक बसवून मध्यभागी एक किलो शेव व दारूची बाटली ठेवली जाते. लग्न जुळले तर दोन्ही पक्ष ते वाटून खातात. विवाहमोडायचा असेल तर बैठकीच्या मध्यभागी दोन काड्या समोरासमोर ठेवल्या जातात. तडजोड करूनही समेट घडला नाही तर त्याच काड्या मोडून रेशीमगाठी  तोडल्या जातात. कायदेशीर घटस्फोट घेण्याचे प्रमाण आजही या समाजात नाही.

’ती’ प्रथा आता नाही

भोंगऱ्या बाजारात लग्न ठरवली जातात किंवा युगुल पळून जाते हा निव्वळ गैरसमज आहे, असे काहीही घडत नाही. आधी तसे व्हायचे पण आता तरुणही सुशिक्षित झाले आहेत. मुलगा पसंत झाला तर घरचे लोक, समाजातील पंच विचारपूस करतात. धकाधकीच्या शहरी जीवनात रुळलेल्या व्यक्तींनी एकदातरी सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या आदिवासी बांधवांबरोबर होलिकोत्सवाचा आनंद लुटायला हवा.