नागरिकता संशोधन विधेयकाला विरोध तीव्र, भूपेन हजारिका यांच्या कुटुंबीयांचा ‘भारतरत्न’ घेण्यास नकार

2

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्र सरकारच्या नागरिकता संशोधन विधेयकाला विरोध तीव्र होत आहे. आसामचे सुपूत्र भूपेन हजारिक यांच्या कुटुंबीयांनी देखील या विधेयकाला विरोध दर्शवत हिंदुस्थानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ स्वीकारण्यास नकार दिला आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

2019चा ‘भारतरत्न’ पुरस्कार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमूख (मरणोत्तर) आणि संगीतकार भूपेन हजारिका (मरणोत्तर) यांना जाहीर झाला होता. हजारिका यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला होता. परंतु आता मात्र कुटुंबीयांनी भारतरत्न स्वीकारण्यास नकार दिला आहे.

दरम्यान भारतरत्न स्वीकारायचा की नाही यावरून हजरिका यांच्या कुटुबीयांमध्ये मतभेत आहेत. हजारिका यांचे पुत्र तेज हजारिका यांनी हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे म्हटले आहे तर भुपेन हजारिका यांचे बंधू समर हजारिका यांनी तेज यांच्या वक्त्यव्यांचे खंडन केले आहे.

भूपेन हजारिका यांचा जन्म आसाममध्ये झाला होता. हजारिका यांनी आसामात चित्रपट संगीतकार, गायक, गीतकार आणि दिग्दर्शक म्हणून विपुल कार्य केले. त्यांनी आसामी भाषेसह हिंदी, बंगाली व अन्य विविध हिंदुस्थानी भाषांमधील गाण्यांना भूपेनदांनी संगीतसाज चढवला. ‘गांधी टू हिटलर’ सिनेमात त्यांनी महात्मा गांधींचे आवडते भजन ‘वैष्णव जन’ गायले.

भूपेन हजारिका यांना 1975 मध्ये ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ मिळाला होता, तसेच 1987 ला ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार, 1977 ला ‘पद्मश्री’ आणि 2001 ला ‘पद्मभूषण’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

नागरिकता संशोधन विधेयकाला आसाममधून तीव्र विरोध होताना दिसत आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या प्रकरणी आतापर्यंत शेकडो आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.