अभिनय हाच ध्यास

1

रंगभूमी, चित्रपट दोन्हीत स्वतःचे कलागुण दाखविण्यास उत्सुक असलेली अभिनेत्री भाग्यश्री मोटे.

रंगभूमीकरून दमदारपणे रूपेरी पडद्यावर आलेली भाग्यश्री मोटे ही अभिनेत्री मूळची पुण्यातली. शालेय शिक्षण घेतल्यानंतर ती मुंबईत आली. अभिनयाची आवड तिला लहानपणापासूनच होती, पण दहावीनंतर जेव्हा ती कॉलेजमध्ये आली तेव्हा त्या आवडीला दिशा मिळाली. कॉलेजत तिने अनेक आंतरमहाविद्यालयीन नाटय़स्पर्धेत भाग घेतला होता. त्याचवेळी तिने चेतन म्हस्के यांचे ’विश्वगर्जना’ हे नाटक केलं. पुढे दोनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये कामं मिळाली. पण तिला खरी ओळख मिळाली ती ’देवयानी’ मालिकेमुळे… त्यानंतर तर थेट प्रियंका चोप्राच्या बॅनरखाली काम करण्याची संधी तिला लाभली. प्रियंकाच्या ’काय रे रास्कला’नंतर तिचा या इंडस्ट्रीत जम बसेल यात शंका नाही.

मालिकेनेच तिला मोठं केलेलं असल्यामुळे मालिकांबद्दल जिव्हाळा असल्याचं ती सांगते. मात्र सिनेमात काम करून आपला विकास ती करवून घेणारच आहे. याबाबत ती म्हणते, मी हिंदी आणि मराठी मालिका केल्यात. पण कलाकार म्हणून मलाही पुढे जायचं आहे. त्यामुळे चित्रपटात काम करत राहणार आहे. सिनेमात काम करण्यासारखं वेगळं सुख नाही, असंही ती स्पष्ट करते. या वर्षभरात तिचे तीन चित्रपट आहेत. त्यातले ’पाटील’ आणि ’माझ्या बायकोचा प्रियकर’ हे दोन प्रदर्शित झाले आहेत, तर ‘विठ्ठल’ या सिनेमात ती पाहुणी कलाकार म्हणून दिसणार आहे. ही भूमिका छोटी जरी असली तरी आपल्यासाठी खूप खास आहे असं तिचं म्हणणं आहे.

या इंडस्ट्रीत तिचा आदर्श प्रियंका चोप्रा हीच आहे. यावर ती म्हणते, प्रियंकाचा सिनेमा केला म्हणून नाही, तर पहिल्यापासूनच ती माझी आदर्श होती आणि पुढेही राहील. तिच्यासोबत मला काम करण्याची खूप इच्छा आहे. तिच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळावी असंही वाटतंय. आता तिला हिंदी सिनेमातही भाग्यश्रीला संधी चालून आली आहे. हार्दिक गज्जर यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा ती करतेय. लककरच या सिनेमाची घोषणा होणार आहे.