वासरावर बिबट्याचा हल्ला

सामना प्रतिनिधी, खेड

तालुक्यातील बोरज घोसाळकरवाडी येथे गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याने या परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. ही घटना आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वासराला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

बोरज घोसाळकरवाडी येथील शेतकरी रोहन येरूणकर यांचा जनावरांचा गोठा त्यांच्या घरालगतच आहे. या गोठ्यात चार गाई आणि दोन वासरे बांधलेली होती. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे दूध काढण्यासाठी जात असता त्यांना गोठ्यात बांधलेल्या गाईंचे हंबरणे ऐकू आले. ते गोठ्यात पोहचले असता गोठ्यात बांधलेले एक वासरू रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले.

बोरज, शिव, मोरवंडे या गावातील जंगलमय परिसरात बिबट्याचा वावर आहे. शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना अनेकदा बिबट्या आढळून आलेला आहे. खेड-शिव-आष्टी मार्गावरही वाहन चालकांची वाट बिबट्याने अडविल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी या परिसरातील नागरिक वनखात्याकडे करत आहेत, परंतु वनखात्याकडून अद्याप बिबट्याचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही.