तब्बल ३५०० कोटींचा हेरॉइनचा साठा जप्त

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

गुजरातच्या समुद्रकिनाऱयाजवळ तटरक्षक दलाने मोठी कारवाई करीत तब्बल दीड हजार किलोंचा हेरॉइनचा साठा जप्त केला आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारात 3500 कोटी रुपये इतकी किंमत आहे. एकाचवेळी इतक्या मोठय़ा प्रमाणात हेरॉइनचा साठा हाती लागण्याची ही पहिलीच घटना आहे. याप्रकरणी हिंदुस्थानच्या तटरक्षक दलाने जहाजावरील आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

जहाजातून अंमली पदार्थांची तस्करी केली जाणार असल्याचा सुगावा तटरक्षक दलाला लागला होता. एम. व्ही. हेन्री जहाज भंगार म्हणून गुजरातच्या अलंग बंदराजवळ आणले जात होते. तत्पूर्वी त्यावर तटरक्षक दलाने कारवाई केली. भंगार स्वरूपात आणल्या जाणाऱया जहाजाचा असा वापर प्रथमच करण्यात आला. भंगार म्हणून आणल्या जाणाऱया जहाजाला किनाऱयावर आणून पुन्हा एकदा शोध मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती संरक्षण खात्याचे जनसंपर्क अधिकारी अभिषेक मॅटिमन यांनी दिली.

कसे राबवले ऑपरेशन

गुजरातच्या सीमेपासून दूर समुद्रात उभ्या असलेल्या जहाजाच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती तटरक्षक दलाला मिळाली होती. त्यानंतर गुप्तचर यंत्रणा, पोलीस, कस्टम, नौदल यांच्यासोबत तटरक्षक दलाने हे ऑपरेशन राबवले. त्यांनी समुद्र पावक नावाच्या जहाजाला त्यांच्या मागे लावले. कमांडो एका बोटीतून संशयित जहाजाजवळ पोचले आणि आत शिरले. त्यांनी जहाजावर ताबा मिळवला.

पेटय़ांमध्ये सापडले अमली पदार्थ

कमांडोंनी जहाजात घुसून शोधमोहीम सुरू केली. निरनिराळया पेटय़ांमध्ये 1500 किलो हेरॉइन सापडले. वेगवेगळया रंगाच्या पाकिटात ते ठेवण्यात आले होते. जहाजावर आठ जण सापडले. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. अमली पदार्थांचा एवढा मोठा साठा कुठून आणला आणि कुणाला सोपवण्यात येणार होता, याची माहिती मिळवली जात आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आठजणांची माहिती पोलिसांनी उघड केलेली नाही.