जोड्यांमध्ये रंगणार बिग बॉसचा नवा सिझन

सामना ऑनलाईन । मुंबई

बिग बॉस हिंदीच्या बाराव्या सिझनची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा सिझन सुरू व्हायला फक्त महिनाभराचा वेळ उरला असून या पर्वात कोण कोणते सेलिब्रिटी पाहायला मिळणार याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र यावेळेस हे सेलिब्रिटी एकटे नाही तर जोड्यांमध्ये घरात प्रवेश करणार आहेत. ही जोडी फक्त नवरा बायकोचीच असेल असे नाही तर सासू सुना, मित्र मैत्रिणी, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, भाऊ बहिण, आई मुलगा असं कुणीही असू शकतं.

बिग बॉस हिंदीच्या गेल्या काही सिझनपासून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. गेल्या काही सिझनमध्ये सामान्य नागरिकांना देखील प्रवेश दिला होता. बिग बॉस १० चे सिझन सामान्यांपैकी एक असलेला मनवीर गुर्जर जिंकला होता. आता १२ व्या सिझनमध्ये काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला असून त्यासाठी स्पर्धक जोड्यांमध्ये खेळताना दिसणार आहेत.

बिग बॉस १२ मध्ये मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोनवार, अभिनेत्री विभा चिब्बर मुलगा पुरू चिब्बर, अभिनेत्री शफाक व फलक नाझ या बहिणी, अभिनेत्री दीपिका कक्कर व तिचा नवरा शोएब इब्राहीम, सिद्धार्थ सागर आणि सुबुही जोशी हे दिसणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.