रिलायन्स इंडस्ट्रीज, जेट एअरवेज यांनी थकवला महापालिकेचा मालमत्ता कर

सामना ऑनलाईन, मुंबई

मालमत्ता कर थकवल्यामुळे मरोळच्या सेवन हिल्स रुग्णालयाला टाळे ठोकल्यानंतर पालिका प्रशासनाने आता मालमत्ता कर थकवणाऱया १०० मालमत्ताधारकांची यादी तयार केली आहे. यात रिलायन्स इंडस्ट्रीज, जेट एअरवेज अशा मोठय़ा कंपन्या आणि विकासकांसोबतच कॉर्पोरेट कंपन्या, मोठय़ा निवासी सोसायटय़ा आणि क्लब यांचाही थकबाकीदारांमध्ये समावेश आहे.

मालमत्ता कर हा पालिकेचा जकातीनंतरचा दुसरा मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे. मात्र अनेक कॉर्पोरेट कंपन्या, विकासक, निवासी सोसायटय़ांनी पालिकेचा मालमत्ता कर थकवला आहे. तर काही प्रकरणे न्यायालयामध्ये अडकलेली असल्यामुळे अशा प्रकरणातील मालमत्ता करही थकीत आहे. अशा विविध कारणांमुळे पालिकेचा तब्बल १० हजार कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे. कोणताही वाद नसलेल्या प्रकणातील थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी करनिर्धारक विभागाने संबंधितांना नोटीस बजावण्याचे काम सुरू केले आहे. सर्वाधिक थकबाकी असलेल्या १०० जणांची यादी पालिकेने तयार केली आहे. यातील अनेकांनी १९९३ पासून थकबाकी भरलेली नाही.  महानगरपालिकेने ही थकबाकी आधी वसूल करण्याचे ठरवले आहे असे पालिकेच्या करनिर्धारण विभागातील अधिकाऱयांनी सांगितले.

यांनी थकवला मालमत्ता कर

  • हिंदुस्थान कंपोझिट लिमिटेड – २९.९८ कोटी
  • भरत डायमंड -२५.५२ कोटी
  • लुथारीया लालचंदानी – २१.९७ कोटी
  • जेट एअरवेज -१६.५८ कोटी
  • रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड – ११.२३ कोटी
  • शापूरजी पालनजी ऍण्ड कं. – १३.६४ कोटी
  • सेंटॉर मार्कंटाइल – १३.०६ कोटी

अशी आहे एकूण थकबाकी

  • वादग्रस्त प्रकरणांत अडकलेली थकबाकी – ५०९४ कोटी
  • वाद, तंटे नसलेली प्रकरणे – ४८५४ कोटी
  • एकूण थकबाकी – ९९४८ कोटी