सिंधू दुसऱ्याच फेरीत पराभूत

सामना ऑनलाईन । टोकियो

कोरिया ओपन जिंकणाऱया हिंदुस्थानच्या पी. व्ही. सिंधूला आज जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या विश्वविजेत्या नोझोमी ओकुहराकडून दुसऱया फेरीतच 18-21, 8-21 असा दारुण पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय यांनी शानदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करीत स्पर्धेतील हिंदुस्थानी आव्हान कायम ठेवले.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा व कोरिया ओपनमध्ये सिंधूने दाखविलेला खेळ आज जपान ओपनच्या दुसऱया फेरीत मात्र दिसला नाही. पहिल्या गेममध्ये तिने विश्वविजेत्या ओकुहराला जोरदार झुंज दिली, मात्र दुसऱया सेटमध्ये ओकुहरापुढे सिंधू पार निप्रभ ठरली. पहिला गेम 21-18 असा जिंकणाऱया ओकुहराने दुसरा सेट आरामात 21-8 असा जिंकत सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न दुसऱया फेरीत उधळून लावले. 45 मिनिटांत ओकुहराने ही लढत जिंकून कोरिया ओपनमधील पराभवाचा वचपा काढला.

श्रीकांत प्रणॉयने आव्हान राखले

हिंदुस्थानी बॅडमिंटनतारका सिंधू दुसऱयाच फेरीत गारद होत असताना पुरुष गटात जागतिक आठवा मानांकित किदांबी श्रीकांत व अमेरिकन ओपन चॅम्पियन एच. एस. प्रणॉय यांनी आपल्या लढती जिंकत स्पर्धेतील हिंदुस्थानी आव्हान कायम राखले. श्रीकांतने हाँगकाँगच्या हू यूनचे आव्हान 21-12, 21-11 असे संपुष्टात आणले तर प्रणॉयने चिनी तैपेईच्या हू जेन लाओवर 21-16, 23-21 अशी मात केली.