नरडवे रोडजवळील फूटपाथला भगदाड

सामना प्रतिनिधी, कणकवली

कणकवली नाथ पै नगर येथील नरडवे रोडलगत असलेल्या फूटपाथला मोठे भगदाड पडले आहे. या फूटपाथवरून मोठ्या स्वरूपात नागरिकांची ये- जा होत नसली तरी मोकाट गुरांचा या भागात वावर असतो. फूटपाथखाली सुमारे दहा फूट खोल गटार आहे. त्यामुळे भगदाडातून कोणीही पडल्यास जीवितहानी होण्याची भीती आहे. याकडे कणकवली नगरपंचायतीचे लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

कणकवली नरडवे रोडवर श्रीधर नाईक चौक ते रेल्वे स्थानकादरम्यान नगरपंचायतीकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ बांधण्यात आला आहे. मात्र त्याचा वापर पादचाऱ्यांकडून विशेष होतच नाही. नाथ पै नगर येथे नम्रता कॉम्प्लेक्सच्या समोरील बाजूने असणाऱ्या फूटपाथला मोठे भगदाड पडले आहे. फूटपाथवरील स्लॅब व त्यावर असलेले पेव्हर ब्लॉक्स पूर्णपणे उखडून गेले असून आतील सुमारे दहा फुटाचे खोल गटार उघडे पडले आहे. या गटारात मनुष्य आणि जनावरांची हानी होण्याची दाट शक्यता आहे. या रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या फूटपाथची दैनावस्था झाली आहे. यावर वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.