मोदी सरकारला धक्का, देशभरातील पोटनिवडणुकीत भाजपची पिछेहाट

सामना ऑनलाईन । मुंबई / नवी दिल्ली

देशभरातील ४ लोकसभा आणि १० विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. लोकसभा निवडणुकीला एक वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत हे निकाल मोदी सरकारची झोप उडवणारे ठरले आहेत.

महाराष्ट्रात पालघरमध्ये भाजपने विजय मिळवला असला तरी त्या ठिकाणी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांनी जोरदार लढत दिली आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपकडून हिसकावून घेतलाय. भंडारा गोंदियामध्ये माजी खासदार नाना पटोले वि. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी लढत होती. या लढतीत मुख्यमंत्र्यांना धक्का बसलाय.

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारवर पुन्हा एका नामुष्की ओढावलीय. कैराना मतदारसंघात भाजपचा पराभव झालाय. समाजवादी पक्षाने नुरपूर विधानसभेची जागाही भाजपकडून हिसकावून घेतलीय. गोरखपूर, फुलपूर पाठोपाठ कैरानातही पराभव झाल्याने योगी सरकारच्या लोकप्रियेतवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पाहूया देशभरातील पोटनिवडणुकांचे निकाल:

लोकसभा

 • उत्तर प्रदेश: कैराना लोकसभा जागेवर राष्ट्रीय लोक दलाच्या तबुस्सम हसन यांना ४३ हजारांची आघाडी
 • भंडारा-गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकरराव कुकडे विजयी
 • पालघर: भाजपच्या राजेंद्र गावित यांचा विजय
 • नागालँड: भाजपच्या पाठिंब्यावर एनडीपीपी-पीडीएचे उमेदवार तोखेहो ३४,६६९ मतांनी आघाडीवर

विधानसभा

 • उत्तर प्रदेश: नूरपूर विधानसभेच्या जागेवर सपाचे उमेदवार नईम-उल-हसन ६२११ मतांनी विजयी
 • बिहार: जोकीहाट येथे राजदच्या शाहनवाज आलम यांना ८१२४० मतं, ४१२२४ मतांनी विजय
 • उत्तराखंड: थारली येथे भाजपच्या मुन्नी देवी यांची १८७२ मतांनी विजय
 • केरळ: चेंगन्नुर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एस चेरिया यांचा २०९५६ मतांनी विजय
 • झारखंड: सिल्ली येथे जेएमएम सीमा महतो यांचा विजय
 • पंजाब: शाहकोट येथे काँग्रेसच्या हरदेव सिंह लाडी ३८८०२ मतांनी विजयी
 • पश्चिम बंगाल: महेश्तला येथे तृणमूल काँग्रेसच्या दुलाल दास यांचा ६२८९६ मतांनी विजय
 • मेघालय: अंपाती येथे काँग्रेस उमेदवार मियानी डी शिरा यांचा ३१९१ विजयी
 • झारखंड: गोमिया जेएमएमच्या उमेदवार बबीता देवी यांनी आजसूच्या उमेदवाराला २००० मतांनी पराभूत केलं
 • कर्नाटक: राजराजेश्वरी नगर जागेवर काँग्रेसचे उमेदवार मुनिरत्ना २५,४९२ मतांनी विजयी
 • पलूस-कडेगाव: महाराष्ट्रातील या जागेवर काँग्रेसचे विश्वजीत कदम आधीच बिनविरोध विजयी झाले आहेत