गंगापूर-वैजापूर महामार्गाच्या कामासाठी जुने वृक्ष तोडले


सामना प्रतिनिधी । गंगापूर

गंगापूर – वैजापूर महामार्गाचे पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र या मार्गाच्या कामासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या ५० ते ६० वर्षांपूर्वीच्या जुन्या वृक्षांची तोड सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला असून, या मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर वृक्ष लागवड करण्याची मागणी केली आहे.

गंगापूर-वैजापूर मार्गाची दुरवस्था झाली होती. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह, पादचाऱ्यांचीही अडचण होत आहे. राज्यात शिवशाही सरकार असताना या रस्त्याचे काम झाले होते. त्यानंतरच्या शासनाने रस्त्याकडे लक्ष न दिल्याने दुरवस्था झाली. गंगापूर ते वैजापूर हे ३५ कि.मी. अंतर पार करण्यासाठी दीड तासापेक्षा अधिक वेळ लागत होता. या रस्त्याचे काम करण्यासंदर्भात अनेक वेळा नागरिकांनी आंदोलन केली.

२२ वर्षांनंतर या रस्त्याचे काम होत असून, तीन पदरी हा मार्ग होत आहे. या रस्त्याचे काम होत असताना या मार्गावरील दुतर्फा असलेली ५० वर्षांपूर्वीची महाकाय अशी वड, लिंब, चिंचाची झाडे तोडण्याचे काम करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही झाडे वाटसरूंना सावली देण्यासह पक्ष्यांचेही आश्रयस्थान झाली होती. त्यामुळे रस्त्याचे काम झाल्यावर पुन्हा झाडे लावण्याची मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.