10 फुटांवरील गणेशमूर्तींना विसर्जन बंदी

सामना प्रतिनिधी । उल्हासनगर

बाप्पाच्या आगमनाला जेमतेम पंधरा दिवस राहिले असताना उल्हासनगर महापालिकेने सार्वजानिक मंडळांसाठी तुघलकी फतवा जारी केला आहे. दहा फुटांवरील गणेशमूर्तींना उल्हासनगरातील तलावांत विसर्जनास बंदी घातल्याचे फर्मान काढल्याने गणेशभक्तांमध्ये संताप आहे. गणेशमूर्ती तयार होऊन वाजतगाजत मंडळांच्या मंडपांमध्ये स्थानापन्नही होऊ लागल्या असताना पालिकेचा फतवा म्हणजे वरातीमागून घोडे असल्याची टीका सर्वत्र होत आहे.

गुरुवार, 13 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. घरगुती आणि सार्वजनिक मंडळांची यासाठीची तयारी अंतिम टप्यात आहे. गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरवला जात आहे. काही ठिकाणी मोठय़ा गणेशमूर्ती तयार होऊन त्या सार्वजनिक मंडळांच्या मंडपात स्थानापन्नही होत आहेत. असे असताना उल्हासनगर पालिका प्रशासनाने सार्वजनिक मंडळांसाठी तुघलकी फतवा काढला आहे. सेंच्युरी रेयॉन बोट क्लब, आयडीआय कंपनी, हिराघाट बोट क्लब, रेल्वे स्थानकाजवळील कृत्रिम तलाव, कैलास कॉलनी या ठिकाणी 10 फुटांवरील गणेशमूर्तींना तलावांत विसर्जनास बंदी घातली असल्यामुळे गणेशभक्तांमध्ये संताप आहे.

शिवसेनेने आयुक्तांना जाब विचारला
शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी पालिका आयुक्त गणेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना या कृत्याचा जाब विचारला. गणेशोत्सव मंडळे चार महिन्यांपूर्वीच मूर्ती बुक करतात. आता मूर्ती तयार झाल्याही आहेत. तुम्ही आधीच सर्व मंडळांची बैठक घेऊन मूर्तीच्या उंचीबाबत कल्पना का दिली नाही? मनात येईल तेव्हा पालिका कायदे, नियम करणार काय, असा सवाल केला. यावेळी आयुक्त निरुत्तर झाले. मोठय़ा मूर्तींना शहरात बंदी करणार असाल तर कल्याणच्या खाडीत मूर्ती विसर्जन करण्याची पोलिसांकडून आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून परवानगी मिळवा, असे चौधरी यांनी आयुक्तांना बजावले.