‘बिग बॉस सिझन 12’चे सलमानकडून गोव्यात दमदार लॉन्चिंग

सामना प्रतिनिधी । पणजी

विचित्र जोडी अशी संकल्पना घेऊन 16 सप्टेंबर पासून सुरु होत असलेल्या ‘बिग बॉस सिझन 12’ची लॉन्चिंग पत्रकार परिषद घेण्यासाठी सलमानने खास गोव्याची निवड केली होती. मंगळवारी अगदी अनोख्या ढंगात त्याने हे लॉन्चिंग केले. यावेळी त्याने एका धमाकेदार गाण्यावर डान्स देखील केला.

यंदाच्या बिग बॉस सिझनसाठी विचित्र जोडी ही संकल्पना घेऊन जोड्या निवडण्यात आल्या आहेत. यात कोण कोण असणार याची उत्सुकता सगळ्याना लागली आहे. सलमानच्या उपस्थितीत मंगळवारी कॉमेडी क्वीन भारती आणि तिचा नवरा हर्ष या एका जोडीची ओळख पत्रकारांना करून दिली. सलमानला कलर्स वाहिनीने आपला ब्रँड अॅम्बेसीडर नेमला आहे.

पत्रकार परिषदेत सलमान म्हणाला, माझे आणि कलर्समध्ये चांगले संबंध जुळले आहेत. गेल्या 9 वर्षापासून आम्ही एकत्र आहोत आणि यापुढे देखील आपला प्रवास असाच सुरू राहील अशी आशा करतो. तसेच बिग बॉसचे होस्टिंग केल्यानंतर मी प्रत्येक एपिसोड 2 वेळा पाहतो, असेही तो म्हणाला.

भारतीची कॉमेडी
‘बिग बॉस सिझन 12’मधील पहिली जोडी असलेल्या भारतीने 2 मिनिटांच्या एंट्रीमध्ये आपले इरादे स्पष्ट केले. लेखकांची मुले सलमान सारखी होतात म्हणून आपण सगळ्याना सोडून एका लेखकाशी लग्न केल्याचे तिने यावेळी गंमतीने सांगितले. तसेच लग्नानंतरची सगळी जबाबदारी कलर्स वाहिनीने घेतल्याबद्दल म्हणत त्यांचे तिने आभार मानले. लग्नानंतर कलर्सने आम्हाला ‘खतरों के खिलाडी’मध्ये घेतलं आणि आता बिग बॉसच्या घरात स्थान दिले आहे, असे भारती यावेळी म्हणाली.