राफेल विमानांच्या खरेदीत मोदी सरकारचा मोठा भ्रष्टाचार- पृथ्वीराज चव्हाण

सामना प्रतिनिधी । नांदेड

नरेंद्र मोदी सरकारने राफेल विमानांच्या खरेदीमध्ये ३६ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडा विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. या शिबिराला काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, ‘मोदी सरकारने राफेल विमानाच्या खरेदीमध्ये केलेला ३६ हजार कोटी रुपयांचा घोटाळा हा सर्वात मोठा घोटाळा आहे. नरेंद्र मोदींनी सत्तेवर आल्यापासून ज्या घोषणा केल्या आहेत त्यापैकी एकही घोषणा अंमलात आणलेली नाही. नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा होता, असे आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देखील म्हटलं. नोटाबंदीनंतर देशाच्या विकास दरामध्येही घसरण झाली.’ दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करुन देऊ, अशी घोषणा मोदींनी केली होती. प्रत्यक्षात दरवर्षी दोन लाख रोजगारही मोदी सरकारने निर्माण केले नाहीत.

दारिद्र्य रेषेखालील महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याची घोषणा उज्वला योजनेमार्फत मोदी सरकारने केली, मात्र यामधून शेगडीचे पैसे वसूल करण्यात आले आहेत. कोकणामधील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या पेट्रोलियम रिफायनरी प्रकल्पास काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

भारतीय जनता पक्षाने नेहमी धार्मिक व्देष पसरविण्याचे काम केले आहे. त्याच बळावर हिंदू आणि मुस्लीम यांच्यात फूट पाडून भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला आहे. परंतु आता जनतेच्या सर्व लक्षात आले आहे. आता भाजपच्या फसव्या घोषणांना जनता फसणार नाही. केंद्रात सत्ता परिवर्तनाची नांदी नांदेडपासूनच सुरु झाली आहे, असेही ते म्हणाले.