बिहारच्या शिक्षण मंडळाची कमाल, कश्मीरला स्वतंत्र देश ठरवले

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहार सरकारच्या अखत्यारित काम करणाऱ्या बिहार एज्युकेशन प्रोजेक्ट कौन्सिल अर्थात बीईपीसी या संस्थेने सातवीच्या परीक्षेच्या पेपरमध्ये मोठा गोंधळ घातला. मंडळाने पेपरमध्ये कश्मीर हा स्वतंत्र देश असल्याचे दाखवले. बिहारच्या शिक्षण मंडळाच्या या कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. बीईपीसी या संस्थेने नजरचुकीने हा प्रकार झाल्याची कबुली दिली आहे. चौकशी करू आणि या प्रकरणाशी संबंधित असलेल्या शिक्षकाला निलंबित करू, असे आश्वासन बीईपीसी संस्थेने दिले आहे.

बिहारमधील शैक्षणिक संस्था सुमार दर्जाच्या आहेत. प्रसारमाध्यमांनी सातत्याने या संदर्भात वृत्तांकन केल्यानंतर बिहार सरकारने स्वतः राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली होती. मात्र एवढे सगळे करुनही सातवीच्या परीक्षेच्या पेपरमध्ये गंभीर चूक झाली. कॉपी होऊ नये म्हणून अनेक पेपरचा संच तयार करुन शेजारी-शेजारी बसलेल्यांना एकसारखे प्रश्न येणार नाही, अशी काळजी घेण्यात आली. त्यासाठी १४०० प्रश्नांचा संच तयार करण्यात आला. मात्र या प्रश्नांमध्येच घोटाळा झाला. या प्रश्नामध्ये देशाचे नाव देऊन तेथील देशवासियांना कोणत्या नावाने ओळखले जाते असे विचारण्यात आले होते. चीनमध्ये राहणाऱ्या लोकांना…., तर नेपाळमधील लोकांना….इंग्लडमध्ये राहणाऱ्या लोकांना….,यानंतर कश्मीर मधील लोकांना…… असा प्रश्न विचारुन कश्मीरला वेगळा देश म्हणून दाखवण्यात आले.