पोलिसाला लाच देण्यासाठी मुलावर भीक मागण्याची वेळ 

सामना ऑनलाईन । पाटणा

पोलीस अधिकाऱ्याला लाच देण्यासाठी एका अनाथ मुलाला भीक मागावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील हा प्रकार आहे. एका अनाथ मुलाकडून आपल्या जमिनीचा एक हिस्सा वाचवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याने लाच मागितली होती. पोलिसाने मागितलेला पैसा गोळा करण्यासाठी हा लहान मुलगा लोकांकडे हात पसरत आहे. वेशाली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक लहान मुलगा भीक मागत होता, त्यावेळी त्याची चौकशी केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला.

विवेक कटहराच्या चेहराकला गावचा रहिवाशी असून तो अनाथ आहे. विवेकची जवळपास एक एकर वडिलोपार्जित जमीन आहे. विवेकचा आरोप आहे की, ‘या जमिनीवर काही गुंडांनी कब्जा करुन तेथे बांधकाम सुरू केलं आहे. याबाबत तक्रार करण्यासाठी विवेक कटहरा पोलीस ठाण्यात पोहोचला त्यावेळी पोलिसाने त्याच्याकडे १० हजार रुपयांची लाच मागितली’. आपल्याकडे एवढे पैसे नसल्याने जमीन वाचवण्यासाठी लोकांकडे भीक मागून पैसे गोळा करत असल्याचे विवेकने सांगितले.

या प्रकरणाची माहिती समजताच जिल्हाधिकारी प्रभूनारायण यादव यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच दोषींवर कडक कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितले. कटहरा पोलीस ठाण्याचे प्रभारी राकेश रंजन यांनी मात्र लाच मागितल्याचा आरोप फेटाळला आहे.