केटरिंगच्या कामाला जायचे अन दुचाकी चोरून आणायचे

सामना प्रतिनिधी । नगर

एखाद्या लग्नसमारंभासाठी केटरिंगच्या कामाला जाऊन येताना दुचाकी चोरून आणणाऱया टोळीचा कोतवाली पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी चारजणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या ११ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. बापू घुले, अविनाश श्रीधर घुले, गणेश पोपट पालवे (तिघे रा. बाळेवाडी, ता. नगर), सागर सानप अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

नगर शहरामध्ये दुचाकी चोरीचे प्रकार वाढत होते. याचा छडा लावण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत होते. शहरात मंडप कामासाठी तसेच केटरिंगसाठी काम करायला येऊन परतताना दुचाकी चोरून नेण्याचा प्रकार एका टोळीकडून सुरू होता. नगर फायनान्स कंपनीचे हप्ते थकविल्यामुळे गाडी ओढून आणल्याचे सांगून गाडी विकण्याचा उद्योग ते करीत होते. मात्र, अशीच एक बुलेट त्यांनी चोरून आणली आणि तेथेच ते फसले.

कोतवाली पोलिसांनी तपास केला असता चोरीची बुलेट शहरात एका नागरिकाला विकल्याचे समजले. ही बुलेट बापू घुले याने आपल्याला विकल्याचे त्यांनी सांगितले. घुले याचा शोध घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केल्यावर अविनाश घुले, गणेश पालवे यांनी मिळून नगर जिह्यातून विविध ठिकाणाहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच या दुचाकी सागर सानप याच्या मदतीने पाथर्डी व बीड जिह्यात विकल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ११ दुचाकी हस्तगत केल्याची माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी दिली.

हेडकॉन्स्टेबल दीपक गाडीलकर, गणेश लबडे, संदीप धामणे, सुमित गवळी, रवींद्र टकले, अविनाश बर्डे, मुकुंद दुधाळ, रवींद्र घुंगासे, संदीप गवारे, नितीन शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.