नांदेड-नागपूर महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला पुन्हा दोघांचा बळी…!

सामना प्रतिनिधी । अर्धापूर

नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावार खड़कूत पाटी जवळ खड्डे चुकवण्यासाठी ट्रक चुकीच्या मार्गाने येऊन दुचाकीला धड़क दिल्याने दोन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातामुळे रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. ही घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली. राष्ट्रीय महामार्ग असून मोठे खड्डे पडले आहेत. अनेकवेळा निदर्शनास आणून देऊनही सबंधित विभागाने मात्र दुर्लक्ष केले.

नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावार दाभड़ येथील युवक दुचाकीवरून (क्र- एम.एच-26 ए.एच.-4137) नांदेड़ला जात होते. नांदेडहून अर्धापूरकड़े येणारा ट्रक (क्र-एम.एच-26 एच 5833) खड्डे असल्यामुळे चुकीच्या मार्गाने दुभाजक ओलांडून चुकीच्या मार्गाने आला आणि समोरील येणाऱ्या दुचाकीला धडकला. यात नंदकुमार संभाजी कदम (22), यूनुस इकबाल शेख (27), अरबाज इकबाल शेख (19) हे गंभीर जखमी झाले. नंदकुमार कदम याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारा दरम्यान यूनुस शेख यांचाही मृत्यू झाला.

अपघातानंतर वसमत फाटा येथील महामार्ग पोलिसांनी जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, ट्रक चालकाना पकडून नागरिकांनी चांगलाच चोप दिला. यावेळी अपघात झाल्यानंतर मोठी गर्दी जमली होती. यावेळी बराच वेळ वाहतूकही खोळंबली होती.