कारच्या धडकेत दुचाकीस्वाराच मृत्यू, कारचालकावर गुन्हा दाखल

सामना ऑनलाईन । मालवण

कोळंब (ओझर) येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वार दीपक अशोक वाघमारे (वय ३४) याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी कारचालक भूषण उर्फ अभी मेस्त्री (२८, रा. रेवतळे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मेस्त्री याला अटकेची नोटीसही बजावण्यात आली असून वाहनांची तपासणी प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांच्याकडून करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दीपक वाघमारे हा दैनंदिन काम आटोपून घरी जात असताना भरधाव स्विफ्ट कारच्या धडकेत त्याचा बुधवारी मध्यरात्री जागीच मृत्यू झाला होता. कारचालकावर गुन्हा दाखल व्हावा व रीतसर पंचनामा करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी दीपक याच्या ज्ञाती बांधव व मित्रपरिवाराने पोलिसांकडे केली होती. याबाबत पोलिसांनी रीतसर पंचनामा करून कारचालक मेस्त्री याच्यावर गुरुवारी गुन्हा दाखल करत अटकेची नोटीस बजावली आहे.